'सन्मानामुळे वाढली जबाबदारी, उत्कृष्ट कामगिरीच्या अपेक्षाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 01:31 AM2019-01-27T01:31:00+5:302019-01-27T01:31:53+5:30
पद्मश्रीचे मानकरी गौतम गंभीर, सुनील छेत्री, बजरंग पुनिया यांनी व्यक्त केल्या भावना
नवी दिल्ली : गौतम गंभीर क्रिकेटरपासून ‘भला माणूस’ बनू इच्छितो. सुनील छेत्रीमध्ये राष्ट्रीय फुटबॉल संघातून खेळताना आणखी मोठी कामगिरी करण्याची भूक कायम आहे. मल्ल बजरंग पुनिया याने याहून मोठी कामगिरी करण्यासाठी देशवाासीयांचे आशीर्वाद मागितले आहेत.
केंद्र शासनाने ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला क्रीडा क्षेत्रातील या दिग्गजांच्या कामगिरीचे कौतुक म्हणून पद्मश्री सन्मान जाहीर केला. या खेळाडूंनी पुरस्कारामुळे जबाबदारी वाढल्याची भावना टिष्ट्वटरद्वारे व्यक्त केली आहे. दोनदा विश्वचॅम्पियन बनलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा सदस्य राहिलेला गौतम गंभीर टिष्ट्वट करीत म्हणाला,‘हा असा सन्मान आहे, ज्याचा आभारासह स्वीकार करतो. या सन्मासोबतच जबाबदारी येते. मी त्या दिवसासाठी जगत आहे, ज्या दिवशी माझ्यातील भला माणूस क्रिकेटपटूला मागे टाकेल तो माझा दिवस असेल. त्या दिवशी मी स्वत:ला पुरस्कृत करेन.’
राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार छेत्रीने टिष्ट्वट केले,‘ माझे कुटुंबीय आणि चाहते या सन्मानाचे हकदार ठरतात. मात्र सध्यातरी निवृत्तीचा इरादा नाही. कृतज्ञ होण्याचे आणखी एक कारण मिळाले. अनेक वर्षे साथ देणारे सहकारी खेळाडू, कोचेस, स्टाफ, मसाजर, फिजियो, आणि व्यवस्थापन या सर्वांचा हा पुरस्कार आहे. मला नेहमी प्रेरित करणारे आई, वडील, बहिणी आणि मित्रांना पुरस्कार समर्पित करतो. देशासाठी खेळणे सुरू राहणार आहे. देश आणि क्लबसाठी खेळताना मैदानावर पाय ठेवेन त्यावेळी माझ्यातील चांगल्या कामगिरीची भूक आणखी वाढलेली असेल. दरदिवशी चांगला माणूस बनण्याचे प्रयत्न देखील सुरूच राहणार आहेत.’
आशियाई क्रीडा स्पर्धेचा सुवर्ण विजेता मल्ल बजरंग पुनियाने लिहिले,‘ प्रतिष्ठेच्या पद्म सन्मानाने गौरव होणे माझ्यासाठी फार मोलाची बाब आहे. चाहत्यांचे प्रेम आणि माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करणाऱ्यांच्या आशीर्वादामुळे माझ्या हातात हा सन्मान आला.आपल्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी मी आणखी कठोर सराव करणार आहे. मला प्रेरणा आणि आशीर्वाद
देत राहा.’ (वृत्तसंस्था)
हा सन्मान‘खास’: शरथ कमल
दोनदा पद्म पुरस्कारापासून वंचित राहिलेला दिग्गज टेबल टेनिसपटू अचंता शरत कमल याने जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत ‘सुवर्णमय’ कामगिरीमुळे हा सन्मान मिळाल्याचे म्हटले आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी‘खास’ असल्याचे शरत म्हणाला.
वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शरत म्हणतो,‘ हा माझा पहिला नागरी सन्मान आहे.काल रात्री बातमी कळली तेव्हा मित्रांसोबत होतो. फोनची बॅटरी डाऊन झाली होती. घरी परतलो तेव्हा आनंदाचे वातावरण होते. मागच्या वर्षीच्या कामगिरीच्या बळावरच हा सन्मान मला मिळू शकला.’
जकार्ता आशियाडमध्ये टेबल टेनिसमधील ६० वर्षांचा दुष्काळ संपविताना शरतने जपानला नमवून भारतीय पुरुष संघाला कांस्य जिंकून दिले शिवाय मनिका बत्रासोबत मिश्र दुहेरीचेही कांस्य पटकविले होते. नव्या विश्व टेटे क्रमवारीत शरत सर्वोत्कृष्ट ३० व्या स्थानावर आला. याच महिन्यात त्याने नववे जेतेपद पटकवून राष्टÑीय जेतेपदाचा कमलेश मेहतांचा विक्रम देखील मागे टाकला.