दुती चंदला सुवर्णपदक, ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत १०० मीटरमध्ये यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 05:40 AM2020-03-01T05:40:17+5:302020-03-01T05:41:10+5:30
भारताची सर्वांत वेगवान महिला धावपटू दुती चंदने शनिवारी येथे खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदकाचा मान मिळवला.
भुवनेश्वर : भारताची सर्वांत वेगवान महिला धावपटू दुती चंदने शनिवारी येथे खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदकाचा मान मिळवला.
दुतीची ही वर्षातील पहिली शर्यत आहे. २४ वर्षीय ही धावपटू आपल्या कलिंग इन्स्टिट्यूट आॅफ इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधित्व करीत आहे. तिने ११.४९ सेकंद वेळेत शर्यत पूर्ण करीत अव्वल स्थान पटकावले. मेंगलोर विद्यापीठाच्या धनलक्ष्मी एस हिने ११.९९ सेकंद वेळेसह दुसरे तर महात्मा गांधी विद्यापीठीची स्नेहा एसएस हिने १२.०८ सेकंद वेळेसह तिसरे स्थान पटकावले.
गेल्या वर्षी राष्ट्रीय ओपन अॅथ्लेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ११.२२ सेकंद वेळेसह आपल्या राष्ट्रीय विक्रमात सुधारणा करणाऱ्या दुतीला टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळविण्यासाठी ११.१५ सेकंदाची वेळ नोंदवणे आवश्यक आहे. ती २०० मीटर स्पर्धेत सहभागी होणार आहे. दुती म्हणाली, ‘माझा सराव चांगला सुरू आहे. मी रोज सहा ते सात तास सराव करीत आहे.
>खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत सहभागी होण्याचा अनुभव शानदार आहे. मी सुवर्णपदकही पटकावले. मी निकालामुळे खूश आहे. २०२० मधील ही माझी पहिली शर्यत आहे. त्यामुळे वर्षाची सुरुवात शानदार झाली. मी पुढील स्पर्धेत वेळेमध्ये १० ते १५ सेकंदाने सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील राहील. मी फिट असून, मला वेगामध्ये सुधारणा करावी लागेल.
- दुती चंद