दुुखापतग्रस्त धवनची श्रीलंका दौऱ्यातून माघार
By admin | Published: August 17, 2015 10:57 PM2015-08-17T22:57:46+5:302015-08-17T22:57:46+5:30
फॉर्मात असलेला सलामीवीर शिखर धवनला हेअरलाईन फॅॅ्रक्चरमुळे श्रीलंका दौऱ्यातून माघार घ्यावी लागली
दुुखापतग्रस्त धवनची श्रीलंका दौऱ्यातून माघार
कोलंबो : फॉर्मात असलेला सलामीवीर शिखर धवनला हेअरलाईन फॅॅ्रक्चरमुळे श्रीलंका दौऱ्यातून माघार घ्यावी लागली. धवन श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांत खेळू
शकणार नाही. धवन दुखापतग्रस्त झाल्यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेविरुद्ध पहिला कसोटी सामना ६३ धावांनी गमवावा लागला. उभय संघांदरम्यान दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून सारा ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे.
बीसीसीआयने प्रसारमाध्यमांना पाठविलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, की बीसीसीआयच्या वैद्यकीय समितीने स्पष्ट केले, की सलामीवीर शिखर धवन श्रीलंका दौऱ्यातून बाहेर झाला आहे. गॅले कसोटी सामन्यादरम्यान धवनच्या हाताला दुखापत झाली होती. त्यानंतरच त्याच्या दुखापतीची चाचणी घेण्यात आली असून, हेअरलाईन फ्रॅक्चर असल्याचे स्पष्ट झाले. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला वेळ लागेल.
पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या धवनला पहिल्या स्लिपमध्ये झेल टिपण्यात अपयश आले, त्या वेळी ही दुखापत झाली. हातावर सूज असताना तो खेळला. या दुखापतीमुळे धवनला चौथ्या दिवशी नैसर्गिक खेळ करता आला नाही. त्याला सुरुवातीला ३६ चेंडूंमध्ये आपल्या वैयक्तिक धावसंख्येत भर घालता आली
नाही. त्याला ड्राईव्ह करताना दुखापतीचा त्रास जाणवत होता. भारतीय संघ सध्या दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे अडचणीत सापडला
आहे. दुसरा सलामीवीर फलंदाज मुरली विजय स्नायूच्या दुखापतीतून सावरत आहे.
संघव्यवस्थापनाने स्पष्ट केले, की फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांच्या मार्गदर्शनाखाली विजय दुखापतीतून सावरत आहे; पण त्याच्या फिटनेसबाबत अंतिम निर्णय दुसरा कसोटी सामना सुरू होण्याच्या
एक दिवसापूर्वी घेण्यात येईल.
सध्या भारतीय संघाकडे एकमेव स्पेशालिस्ट फलंदाज लोकेश राहुल आहे, तर चेतेश्वर पुजाराला भारतातर्फे काही सामन्यांमध्ये डावाची सुरुवात करण्याचा अनुभव आहे. पुजाराने अलीकडे राहुलच्या साथीने चेन्नईमध्ये भारत ‘अ’ संघातर्फे आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध डावाची सुरुवात केली होती.
स्टुअर्ट बिन्नीची रविवारी १६ वा सदस्य म्हणून संघात निवड करण्यात आली, पण आता धवन दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघात १५ खेळाडूंच आहेत. संघ व्यवस्थापनाने
अद्याप धवनच्या पर्यायी खेळाडूची घोषणा केलेली नाही. निवड समितीचे दोन सदस्य विक्रम राठोड व साबा करीम संघासोबत श्रीलंका दौऱ्यावर आहेत. (वृत्तसंस्था)