जेतेपद पटकाविण्यास मरे उत्सुक
By admin | Published: January 16, 2017 05:22 AM2017-01-16T05:22:37+5:302017-01-16T05:22:37+5:30
ब्रिटनचा दिग्गज टेनिसपटू अँडी मरे आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत होण्याची मालिका खंडित करण्यास उत्सुक आहे.
मेलबोर्न : ब्रिटनचा दिग्गज टेनिसपटू अँडी मरे आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत होण्याची मालिका खंडित करण्यास उत्सुक आहे. या स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत आहे. महान टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच सर्वकालिक चॅम्पियन होण्यासाठी प्रयत्नशील आहे.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला मरे निराशाजनक कामगिरी टाळण्यास प्रयत्नशील आहे. यावेळीही त्याला अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला, तर १९६८ नंतर ओपन युगात एकाच प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहा ग्रँडस्लॅममध्ये पराभूत होणारा तो पहिला खेळाडू ठरेल. त्याचे प्रशिक्षक इव्हान लेंडल यांना अमेरिकन ओपनच्या पाच फायनल्समध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर १९८५ मध्ये न्यूयॉर्कमध्ये त्यांना पराभवाचे दृष्टचक्र भेदण्यात यश आले होते. मरे आपल्या मोहिमेची सुरुवात युक्रेनच्या इलिया माचेंकोविरुद्धच्या लढतीने करणार आहे. यावेळी आॅस्ट्रेलियाने ओपनचे पहिले जेतेपद पटकाविण्याची चांगली संधी असल्याचे मरे याचे मत आहे.
ड्रॉचा विचार करता मरेला उपांत्यपूर्व फेरीत पाचवे मानांकन प्राप्त जपानचा निशिकोरी किंवा स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. उपांत्य फेरीत त्याची गाठ २०१४ चा विजेता स्टेनिसलास वावरिंकासोबत पडू शकते.