जोकोविचची ‘सहज’ आगेकूच

By admin | Published: September 8, 2016 04:26 AM2016-09-08T04:26:04+5:302016-09-08T04:26:04+5:30

जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू नोव्हाक जोकोविचची यूएस ओपनमधील ‘सहज’ आगेकूच कायम राहिली. पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी खेळाडू फ्रान्सच्या विल्फ्रेड त्सोंगाने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे

'Easy' advance of Djokovic | जोकोविचची ‘सहज’ आगेकूच

जोकोविचची ‘सहज’ आगेकूच

Next

न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू नोव्हाक जोकोविचची यूएस ओपनमधील ‘सहज’ आगेकूच कायम राहिली. पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी खेळाडू फ्रान्सच्या विल्फ्रेड त्सोंगाने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे (रिटायर्ड हर्ट) जोकोविचने सहजपणे उपांत्य फेरीत प्रवेश केला. विशेष म्हणजे जोकोने गेल्या पाच सामन्यांतून केवळ दोन सामनेच पूर्ण खेळले असून तीन सामन्यांत प्रतिस्पर्धी खेळाडूने माघार घेतल्याने किंवा रिटायर्ड हर्ट झाल्याने जोकोचा पुढील फेरीत प्रवेश झाला. त्याचवेळी महिलांमध्ये कॅरोलिन वोज्नियाकी हिनेही दुखापतग्रस्त खेळाडूविरुद्ध दणदणीत विजय मिळवताना उपांत्य फेरी गाठली.
सर्बियाच्या जोकोने यासह सलग १० व्यांदा यूएस ओपनची उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीत जोकोसमोर आव्हान होते ते फ्रान्सच्या विल्फ्रेड त्सोंगा याचे.
त्सोंगाविरुद्ध जोकोने आपल्या लौकिकानुसार धडाकेबाज खेळ करताना पहिले दोन सेट ६-३, ६-२ असे सहजपणे जिंकत दमदार आघाडी घेतली. यानंतर तिसरा सेट सुरू असताना त्सोंगाची दुखापत उफाळून आली. जोको ५-२ असा आघाडीवर असताना त्सोंगाचा डावा गुडघा दुखायला लागला. या वेळी त्याने मेडिकल टाइमआऊट घेतला. मात्र, काही वेळाने तो रिटायर्ड हर्ट झाल्याने जोकोचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित झाला.
दखल घेण्याची बाब म्हणजे, यंदाची यूएस ओपन जोकोसाठी आरामदायक ठरली आहे. यंदा त्याने केवळ दोन सामने पूर्ण खेळले आहेत, तर तीन सामन्यांत प्रतिस्पर्धी खेळाडूंनी माघार घेतल्याने त्याला पुढील फेरीसाठी चाल मिळाली. स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत बाय मिळाल्यानंतर तिसऱ्या फेरीत अवघे सहा गेम झाल्यानंतर प्रतिस्पर्धी खेळाडू रिटायर्ड हर्ट झाला. तर, उपांत्यपूर्व फेरीत त्सोंगा अखेरच्या क्षणी रिटायर्ड हर्ट झाल्याने जोकोचा उपांत्य फेरीतील प्रवेश सुकर झाला.
यंदा, आॅस्टे्रलियन आणि फ्रेंच ओपनमध्ये विजेतेपद पटकावलेल्या जोकोपुढे यूएस ओपनच्या उपांत्य फेरीत फ्रान्सच्या १० व्या मानांकित गाएल मोंफिल्सचे आव्हान असेल. गाएलने आपल्याच देशाच्या २४ व्या मानांकित लुकास पोइलीचा सलग तीन सेटमध्ये ६-४, ६-३, ६-३ असे नमवले. दरम्यान, आतापर्यंत १२ वेळा जोकोविरुद्ध खेळलेल्या पोइलीला एकदाही जोकोला नमविण्यात यश आलेले नाही.
दुसरीकडे, महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या वोज्नियाकीने लात्वियाच्या अनास्तासिजा सेवासोवाचा सलग दोन सेटमध्ये ६-०, ६-२ असा धुव्वा उडवला. दुसऱ्या मानांकित जर्मनीच्या अँजेलिक केर्बरने पहिल्या सेटमध्ये मिळालेल्या कडव्या झुंजीनंतर दुसऱ्या सेटमध्ये वेगवान खेळ करत इटलीच्या रॉबर्टा विन्सीचा ७-५, ६-० असा पाडाव केला. टाचेला असलेल्या दुखापतीनंतरही वोज्नियाकीने सेवासोवाविरुद्ध सहज बाजी मारताना दिमाखात आगेकूच केली. त्याचवेळी सेवासोवाने ग्रँडस्लॅमची उपांत्यपूर्व फेरी गाठणारी लात्वियाची पहिली खेळाडू असा पराक्रमही केला. (वृत्तसंस्था)

Web Title: 'Easy' advance of Djokovic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.