ईडन गार्डनवर आत्तापर्यंत पाकिस्तानचीच सरशी...
By admin | Published: March 19, 2016 12:30 PM2016-03-19T12:30:26+5:302016-03-19T12:44:42+5:30
भारतीय चाहते भारताच्या विजयासाठी प्रार्थना करत असतानाच पाकिस्तानी संघाची ईडन गार्डनवरील कामगिरी टीम इंडियाची चिंता वाढविण्यास कारणीभूत ठरू शकते.
Next
>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १९ - पाकिस्तान संघ विश्वकप टी-२० स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे निश्चित झाले असून, आजच्या सामन्यात ते परंपरागत प्रतिस्पर्धी असलेल्या भारताला हरवून पराभवाची मालिका खंडित करण्यात यशस्वी ठरतील का, याबाबत उत्सुकता आहे. एकीकडे भारतीय चाहते भारताच्या विजयासाठी प्रार्थना करत असतानाच पाकिस्तानी संघाची ईडन गार्डनवरील कामगिरी टीम इंडियाची चिंता वाढविण्यास कारणीभूत ठरू शकते.
ईडन गार्डनमध्ये पहिला वन-डे सामना १८ जानेवारी १९८७ रोजी खेळला गेला. त्यात पाकिस्तानने दोन गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर २८ ऑक्टोबर १९८९ रोजी पाकिस्तानने भारताचा ७७ धावांनी तर १३ नोव्हेंबर २००४ रोजी ६ गडी राखून विजय मिळवला होता. ३ जानेवारी २०१३ रोजी पाकिस्तानने भारताविरुद्ध ८५ धावांनी विजय मिळवला होता. ईडन गार्डनवर आतापर्यंत केवळ दोन टी-२० सामने खेळले गेले असून, त्यात एका लढतीत भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे, तर एक सामना रद्द झाला होता.
वर्ल्डकपच्या सर्व प्रकारांमध्ये भारताची पाकिस्तान विरोधातील आतापर्यंतची कामगिरी अजिंक्य असली तरी, ईडन गार्डनची आकडेवारी मात्र पाकिस्तानच्या बाजूने जाणारी आहे. वनडे आणि कसोटीमध्ये मिळून भारत पाकिस्तानमध्ये ईडन गार्डनवर आतापर्यंत ११ सामने झाले. त्यापैकी भारताने फक्ते १ सामना जिंकला असून, ५ सामने पाकिस्तानने जिंकले आहेत तर अन्य ५ सामने अनिर्णित राहिले आहेत.
भारत वि. पाकिस्तान लढतीतील मुख्य मुद्दे :
- टी-२० क्रमवारीत भारत पहिल्या, तर पाकिस्तान ६ व्या क्रमांकावर आहे.
- टी -२० वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानची ४ वेळा लढत झाली आहे. या चारही सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला धूळ चारली आहे. आता या दोन्ही संघांमधील पाचवा सामना आज कोकात्यात होत असून सर्वांचेच त्याकडे लक्ष लागले आहे.
- भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान टी-२० फॉरमॅटमध्ये आतापर्यंत ७ सामने झाले आहेत. यामध्ये भारताने ५, तर पाकिस्तानने १ सामना जिंकला आहे. टाय झालेला एक सामना भारतीय संघाने बोल्डआउटमध्ये (सुपर ओव्हर) जिंकला आहे
- २०१२-१३ : भारतामध्ये या दोन्ही संघांमध्ये झालेल्या दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकून मालिका अनिर्णित राखली होती.
- भारताने टी-२० मध्ये आतापर्यंत एकूण ६४ सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी ३८ सामने जिंकले असून, २५ मध्ये पराभव पत्करला आहे. एक सामना टाय झाला. तर पाकिस्तानी संघाने आतापर्यंत ९८ सामने खेळले असून त्यापैकी त्यांनी ५८ जिंकले तर ४० सामन्यात ते पराभूत झाले.
- वनडेमध्ये भारत-पाकिस्तानदरम्यान १२७ लढती झाल्या आहेत. यामध्ये भारताने ५१, तर पाकिस्तानने ७२ सामने जिंकले आहेत. ४ सामन्यांचा निकाल लागू शकला नाही.
भारत-पाक सामन्याबाबत दिग्गजांचे मत
अमिताभ बच्चन
सोशल मिडीयावर सक्रीय असणा-या अमिताभ यांनी टीम इंडियाचे समर्थन केले आहे. आपल्या टी-२० संघाला पराभवामुळे धक्का बसला आहे. पण आमचा तुमच्यावर विश्वास आहे. टीम इंडिया चिंता करु नका आम्ही तुमच्यासोबत आहोत असा संघाचा हुरुप वाढवणारा संदेश बच्चन यांनी टि्वटरवरुन दिला आहे.
सुनील गावसकर
ईडन गार्डनवर आज खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या हाय व्होल्टेज सामन्यात पाकिस्तान संघाचे पारडे जड राहील, असे भाकीत माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी केले आहे. या दोन्ही संघांबद्दल गावसकर म्हणाले, ‘न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर चांगली कामगिरी करण्याचे भारतावर दडपण असेल. पाक संघाने मात्र पहिला सामना जिंकल्याने त्यांचे मनोबल उंचावले आहे. अशावेळी पाकला भारताविरुद्ध सामन्यात विजयाची अधिक संधी असेल.
वासिम आक्रम
पाकिस्तानचा संघ शांत व नियंत्रणामध्ये दिसत आहे. बांगलादेशविरुद्ध पाकने दिमाखदार विजय मिळवला. त्यात संघाची देहबोली सर्वांत सकारात्मक बाब आहे. या विजयामुळे संघाचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळेल. पाकिस्तान संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकतो.
वकार युनीस
पाकिस्तानपेक्षा भारत जास्त दबावाखाली आहे, टी २० विश्वचषकाच्या सुरवातीच्या सामन्यात भारताला न्युझीलंडकडून दारुण पराभव स्वीकारावा लागला तर पाकिस्तानने बांगलादेश संघाचा दणदणीत पराभव केला आहे. भारतीय गोलंदाजांची अलीकडे फार चांगली कामगिरी झाली, हे खरे असले तरी आपल्या प्रेक्षकांपुढे विजयाचे दडपण घेऊन खेळताना कशी दाणादाण होते, हे नागपुरात पाहायला मिळाले. त्यामुळे १९ तारखेच्या होणाऱ्या भारत-पाक सामन्यात भारत दडपणाखाली असेल.