भारतीय गोलंदाजांकडून बाउन्सरचा प्रभावी वापर
By admin | Published: March 23, 2015 01:31 AM2015-03-23T01:31:05+5:302015-03-23T01:31:05+5:30
सर्वसाधारण विचार करता कमकुवत मानल्या जाणाऱ्या भारताच्या वेगवान गोलंदाजांनी विश्वकप क्रि केट स्पर्धेत छाप सोडली आहे.
सिडनी : सर्वसाधारण विचार करता कमकुवत मानल्या जाणाऱ्या भारताच्या वेगवान गोलंदाजांनी विश्वकप क्रि केट स्पर्धेत छाप सोडली आहे. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाच्या ७० पैकी ४३ फलंदाजांना माघारी परतवण्याची कामगिरी केली आहे. भारतीय संघ आॅस्ट्रेलियात दाखल झाला तेव्हापासून भारतीय फलंदाज उसळी मिळणाऱ्या खेळपट्टीवर शॉट पिच चेंडूंना कसे सामोरे जाणार, असा प्रश्न विचारला जात होता, पण तीन महिन्यांच्या कालावधीनंतर भारताच्या वेगवान गोलंदाजांनी आखूड टप्प्याच्या माराचा योग्य वापर करीत प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे. भारताने आतापर्यंत सात सामन्यांत प्रतिस्पर्धी संघाच्या ७० विकेट घेतल्या आहेत. त्यातील ४३ विकेट वेगवान गोलंदाजांनी घेतल्या. त्यापैकी २५ फलंदाज आखूड टप्प्याच्या चेंडूंवर बाद झाले आहेत, हे विशेष.
काही दिवसांपूर्वी कर्णधार धोनीने तीन वर्षांपूर्वीच्या पत्रकार परिषदेचा उल्लेख केला होता. त्यावेळी त्याला ‘आयसीसी’ने प्रत्येक षटकात दोन बाऊन्सरला परवानगी देण्याबाबत विचारण्यात आले होते. धोनी म्हणाला होता, ‘कुणीतरी मला प्रतिषटक दोन बाऊन्सरच्या नियमावर प्रतिक्रिया विचारत होता. मी उत्तर दिले होते, ‘एक बाऊन्सर व्यवस्थितपणे टाकता येत नाही, मग दोन बाऊन्सर काय मी घरी घेऊन जाणार.’ त्यावेळी धोनीच्या या व्यंगात्मक उत्तराला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या वेगवान गोलंदाजांनी कसून मेहनत घेतली. आॅस्ट्रेलियात वेगवान गोलंदाजांना अधिक बळी मिळतात, हा अनुभव आहे, पण यापूर्वी भारतीय गोलंदाजांना येथील खेळपट्ट्यांचा कधीच एवढा प्रभावी वापर करता आलेला नाही.
भारतातर्फे मोहम्मद शमीने १७ विकेट घेतल्या आहेत, तर उमेश यादवने १४ आणि मोहित शर्माने ११ बळी घेतले आहेत. या स्पर्धेत मोहम्मद शमीच्या स्थानी एकमेव सामना खेळणाऱ्या भुवनेश्वर कुमारने एक बळी घेतला आहे. त्यात मोहितने बाऊन्सरचा प्रभावी वापर केला आहे. मोहित १३० किलोमीटर प्रति तास वेगाने गोलंदाजी करताना अचानक १४० किलोमीटर प्रति तास वेगाने मारा करू शकतो. पाकचा माजी वेगवान गोलंदाज व यूएई संघाचा प्रशिक्षक आकीब जावेदने पर्थमध्ये म्हटले होते की, ‘मोहितचा बाऊन्सर सर्वांत प्रभावी आहे.’ कर्णधार धोनीचेही मोहितबाबत असेच मत आहे. (वृत्तसंस्था)