काल पात्र, आज अपात्र कशी? एवढे कठोर नियम? 100 ग्रॅमने असे काय झाले असते; जाणून घ्या ऑलिम्पिकचा नियम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 01:40 PM2024-08-07T13:40:58+5:302024-08-07T13:41:43+5:30
Vinesh Phogat disqualify news: रेसलिंगमध्ये वजनाचे काही नियम आहेत. त्या नियमांवर बोट ठेवूनच ऑलिम्पिक समितीने फोगाटला डिसक्वालिफाय केले आहे.
अवघ्या १०० ग्रॅम वजनाने भारताचे गोल्ड मेडल हुकले आहे. भारतीयांसाठी हे खूप धक्कादायक आहे. एवढे कठोर वागल्यामुळे ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकण्याची मागणीही आपच्या नेत्याने केली आहे. भारतीय चाहत्यांकडून वेगवेगळ्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. 100 ग्रॅम जास्तीच्या वजनाने असे काय आभाळ कोसळले असते, एवढा कठोर नियम आहे तरी काय? चला जाणून घेऊया...
Vinesh Phogat: विनेश फोगाटचे किती ग्रॅम वजन जास्त भरले, आता अपिलही नाही, पदकही नाही
विनेशने एक दिवस आधीच तीन मॅच खेळल्या होत्या, तेव्हा तिचे वजन ५० किलोच्या आत होते. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा वजन मोजायची गरज काय होती? असा सवाल विचारला जात आहे. रेसलिंगमध्ये वजनाचे काही नियम आहेत. त्या नियमांवर बोट ठेवूनच ऑलिम्पिक समितीने फोगाटला डिसक्वालिफाय केले आहे.
नियमानुसार सामन्यापूर्वी खेळाडूचे वजन मोजले जाते. जर कुस्तीपटू दोन दिवस खेळत असेल तर त्याचे दोन्ही दिवस वजन केले जाते. ज्या दिवशी सामना असतो त्याच दिवशी सकाळी हे वजन केले जाते. ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक वजनी गटाचे सामने दोन दिवस खेळले जातात. जे खेळाडू फायनलमध्ये पोहोचतात त्यांचे दोन्ही दिवस वजन तपासले जाते.
जर एखाद्या कुस्तीपटूचे वजन जास्त भरले तर त्याला ते कमी करण्यासाठी पहिल्या दिवशी ३० मिनिटांचा कालावधी दिला जातो. या काळात तो व्यायाम करून, सायकलिंग सारख्या अॅक्टिव्हिटीज करून वजन कमी करू शकतो. तसेच या ३० मिनिटांत तो कितीही वेळा वजन तपासू शकतो.
परंतू दुसऱ्या दिवशी खेळाडूला केवळ १५ मिनिटे दिली जातात. या कमी वेळात त्याला वजन निर्धारित गटाच्या वजनाखाली आणायचे असते. वजन केल्यानंतर खेळाडूंच्या आरोग्याची चाचणी केली जाते. यात नखे कापलेली आहेत का हे देखील पाहिले जाते. वजनावेळी फक्त सिंगलेट परिधान करण्याची परवानगी असते.
फ्रिस्टाईल रेसिंगमध्ये अनेक वजनी गट असतात महिलांसाठी 50,53, 57, 62, 68, 76 किलो वजनी गट आहेत. तर पुरुषांसाठी 57, 65, 74, 86, 97, 125 किलो असे वजनी गट आहेत. विनेशने आपला नेहमीचा ५३ किलोचा गट सोडून ५० किलोसाठी खेळ केला होता.