ऑलिम्पिक पदकाच्या दावेदार जलतरणपटूची प्रियकराकडून निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 03:43 PM2018-12-27T15:43:53+5:302018-12-27T15:45:58+5:30
क्रीडा कारकीर्द घडवण्यासाठी प्रियकराला तिने नकार दिला आणि त्यानंतर आयुष्यात आलेल्या वादळाने तिला जीव गमवावा लागला.
रशिया : क्रीडा कारकीर्द घडवण्यासाठी प्रियकराला तिने नकार दिला आणि त्यानंतर आयुष्यात आलेल्या वादळाने तिला जीव गमवावा लागला. देशाला ऑलिम्पिक पदक जिंकून देण्याचा निर्धार तिने केला होता आणि त्यासाठी तिने संपूर्ण लक्ष आपल्या खेळावर केंद्रित करण्याचे ठरवले होते. पण, प्रियकराला तिचं हे वागणं पटलं नाही आणि त्यानं क्रूरपणे तिची हत्या केली. हा नकार इतका जिव्हारी लागला की त्याने धारधार शस्त्राने तिला 30 हून अधिकवेळा भोसकले.
रशियाच्या 16 वर्षीय साफिया अस्कारोव्हा सोबत घडलेला हा थरकाप उडवणारा प्रकार. ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने प्रेमसंबंधापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय तिने प्रियकर निकीता मॅलिजीन याला सांगितलाही, परंतु तिला समजून घेण्याइतकं मोठं मनं त्याच्याकडे नव्हते. तिचा नकार तो पचवू शकला नाही आणि त्याने साफियाच्या मानेत, छातीत आणि पोटात असे एकूण 30हून अधिक वेळा शस्त्राने भोसकले. टोलिट्टी शहरात ही घटना घडली.
मॅलिजीन हाही जलतरणपटू होता, परंतु त्याला साफिया इतके यशस्वी होता आले नाही. तिच्या यशाची त्याला ईर्ष्या वाटायची, असा दावा साफियाच्या मित्रमैत्रीणींनी केला. मॅलिजीनने खून केल्याची कबुली देताना दिलेल्या जबाबातून उभा राहिलेला प्रसंग थरकाप उडवणारा होता. हे नातं टिकावं यासाठी मॅलिजीनने साफियाला विनंती केली होती, परंतु तिने 'Go to hell' असे उत्तर देताच मॅलिजीनने हे टोकाचे पाऊल उचलले.