भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात
By admin | Published: March 12, 2016 03:13 AM2016-03-12T03:13:37+5:302016-03-12T03:13:37+5:30
भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू सायना नेहवालसह बी. साई प्रणीत, के. श्रीकांत, क्वालीफायर खेळाडू समीर यांना आॅल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.
बर्मिंघम : भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू सायना नेहवालसह बी. साई प्रणीत, के. श्रीकांत, क्वालीफायर खेळाडू समीर यांना आॅल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे या स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले.
सायनाला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चिनी तैपेईच्या तेई जू यिंग हिच्याकडून ४० मिनिटांच्या लढतीत २१-१५, २१-१६ अशी मात खावी लागली. यिंगकडून सायनाचा हा सलग पाचवा पराभव ठरला. यापूर्वीच्या चारही लढतीत यिंगनेच बाजी मारली होती.
गैरमानांकित प्रणीतला पुरुष गटातील एकेरीच्या दुसऱ्या फेरीत डेन्मार्कच्या हांग क्रिस्टीयन विटीघस याच्याकडून १ तास आणि ४ मिनिटांपर्यंत चाललेल्या अटीतटीच्या लढतीत १२-२१, २१-११, २१-१६ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे या खेळाडूने पहिल्या फेरीत मलेशियाच्या चोंग वेईला धूळ चारून सर्वांना आश्चर्यचकित केले होते.
अन्य लढतीत के. श्रीकांत याला जपानच्या चौथे मानांकनप्राप्त केंतो मोमोता याच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. या लढतीत मोमोता याने अवघ्या ३१ मिनिटांत १०-२१, १३-२१ असा विजय मिळवीत स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. या दोन्ही खेळाडूंतील हा ९ वा सामना होता. यापैकी जपानच्या या खेळाडूने सहा सामने आपल्या नावे केले
आहेत.
दरम्यान, प्रणीत याने डेन्मार्कच्या खेळाडूविरुद्ध सुरुवातीला उत्कृष्ट खेळ केला. याच बळावर त्याने हा गेम २१-१२ असा जिंकला होता. मात्र, पुढच्या दोन्ही गेममध्ये त्याला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. अन्य एका क्वालिफायर लढतीत भारताच्या समीरला चीनच्या तियान हाऊवेईकडून २१-१०, १२-२१, १९-२१ अशी मात खावी लागली. (वृत्तसंस्था)