तिरंदाजीत भारताचे आव्हान संपुष्टात, अतानू दास बाहेर
By Admin | Published: August 12, 2016 07:25 PM2016-08-12T19:25:48+5:302016-08-12T19:25:48+5:30
तिरंदाजीमध्ये भारताची अखेरची आशा असलेला अतानू दासला शुक्रवारी कोरियाच्या सियुंगयुन लीविरुद्ध ४-६ ने पराभव स्वीकारावा लागला.
ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. 12 - तिरंदाजीमध्ये भारताची अखेरची आशा असलेला अतानू दासला शुक्रवारी कोरियाच्या सियुंगयुन लीविरुद्ध ४-६ ने पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे आॅलिम्पिक तिरंदाजी स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात आले. आॅलिम्पिकमध्ये भारतीय तिरंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली.
माजी विश्व चॅम्पियन लीने उपउपांत्यपूर्व फेरीत अतानूचा ३०-२८, २८-३०, २७-७२, २८-२७ आणि २८-२८ ने पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. २०१३ चा विश्व चॅम्पियन कोरियाच्या लीने दोन सेट्स जिंकले, तर दोन सेट्स टाय झाले. भारतीय तिरंदाजाला केवळ दुसरा सेट जिंकता आला. दीपिका कुमारी, बोंबायला देवी आणि लक्ष्मीराणी मांझी यांच्या पराभवानंतर भारताच्या आशा कोलकाताच्या अतानू दासच्या कामगिरीवर केंद्रित झाल्या होत्या, पण निर्णायक क्षणी केलेल्या चुकांमुळे त्याला पराभव स्वीकारावा लागला. अतानूने पहिला सेट २८-३० ने गमाविला. या सेटमध्ये लीने सलग तीन परफेक्ट टेनची नोंद केली. अतानूने दुसऱ्या सेटमध्ये सलग तीन परफेक्ट टेन मिळवताना ३०-२८ ने सरशी साधली. तिसऱ्या सेटमध्ये लीने अखेरच्या शॉटवर ८ गुण वसूल केले. त्याचा स्कोअर २७ होता. अतानूला ९ गुण वसूल करील सेट जिंकण्याची संधी होती, पण अतानूने ८ गुण मिळवत आघाडी घेण्याची संधी गमावली. तिसरा सेट २७-२७ ने बरबोरीत संपला. उभय खेळाडूंना प्रत्येकी एक गुण मिळाला. चौथ्या सेटमध्ये लीने ९, ९ आणि १० असे गुण नोंदवले तर अतानूला ९, ९ आणि ९ असा स्कोअर करता आला. लीने हा सेट २८-२७ ने जिंकत ५-३ अशी आघाडी घेतली. अतानूला लढत शुटआऊटपर्यंत लांबविण्यासाठी अखेरचा सेट जिंकणे आवश्यक होते. पण, हा सेट २८-२८ ने बरोबरीत संपला आणि कोरियन तिरंदाजाने एक गुण कमाई करीत लढत ६-४ ने जिंकली.