मेरी कोमचे आव्हान संपुष्टात
By Admin | Published: June 24, 2017 02:05 AM2017-06-24T02:05:30+5:302017-06-24T02:05:30+5:30
पाचवेळची विश्वविजेती भारताची स्टार बॉक्सर एमसी मेरी कोम (५१ किलो) हिला उलनबाटोर कप बॉक्सिंग स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळावा लागला.
नवी दिल्ली : पाचवेळची विश्वविजेती भारताची स्टार बॉक्सर एमसी मेरी कोम (५१ किलो) हिला उलनबाटोर कप बॉक्सिंग स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळावा लागला. पहिल्या सामन्यात बाय मिळाल्यानंतर उपांत्यपूर्व फेरी गाठलेल्या मेरी कोमला निराशाजनक पराभवास सामोरे जावे लागले. त्याचवेळी, तीन पुरुष व एक महिला असे भारताचे एकूण चार बॉक्सर्स उपांत्य फेरीत पोहोचले.
एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बॉक्सिंग रिंगमध्ये उतरलेल्या मेरी कोमवर भारताच्या सर्वाधिक आशा होत्या. तिच्या पराभवाने भारतीयांच्या पदरी निराशा आली. कोरियाच्या चोलमी बांगविरुद्ध झालेल्या सर्वसंमत निर्णयामध्ये मेरीला पराभवास सामोरे जावे लागले. आपल्याहून उंच असलेल्या प्रतिस्पर्धीविरुद्ध ठोसे लगावण्यात मेरीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. शिवाय मर्यादेपेक्षा जास्त वाकल्याने एकदा मेरीला पंचांनी समजही दिली. या पराभवानंतर मेरीने लाइट फ्लायवेट (४८ किलो) वजनी गटात खेळण्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आशियाई अजिंक्यपद आणि पुढीलवर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या तयारीकडे ती लक्ष केंद्रित करेल.
दुसरीकडे, आशियाई युवा रौप्यपदक विजेता अंकुश दहिया (६०), स्टे्रनद्जा स्मृती सुवर्ण विजेता मोहम्मद हसमुद्दिन (५६), किंग्ज कप विजेता श्याम कुमार (४९) आणि प्रियांका चौधरी (६०) यांनी आपआपल्या वजनी गटात विजयी कूच कायम राखताना उपांत्य फेरीत धडक मारली.