आरसीबीचे आव्हान संपुष्टात?

By admin | Published: April 30, 2017 05:39 AM2017-04-30T05:39:11+5:302017-04-30T05:39:11+5:30

बुडत्याचा पाय खोलात या म्हणीप्रमाणे एकापाठोपाठ एक पराभवाचे धक्के खाणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाला आज, शनिवारी येथे झालेल्या सामन्यात रायजिंग पुणे सुपर

At the end of the RCB challenge? | आरसीबीचे आव्हान संपुष्टात?

आरसीबीचे आव्हान संपुष्टात?

Next

- विश्वास चरणकर,  पुणे

बुडत्याचा पाय खोलात या म्हणीप्रमाणे एकापाठोपाठ एक पराभवाचे धक्के खाणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाला आज, शनिवारी येथे झालेल्या सामन्यात रायजिंग पुणे सुपर जायंट संघाने ६१ धावांनी हरवले. या पराभवाने बँगलोर संघाचे आव्हान संपुष्टात आल्यात जमा आहे. होम ग्राउंडवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या पुणे संघाने ३ बाद १५७ धावा केल्या, पण आरसीबीला हे आव्हानही पेलेले नाही. त्यांनी निर्धारीत २0 षटकांत ९ बाद ९६ धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीने एकाकी झुंज देताना ५५ धावा केल्या. पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळू शकली नाही. बँगलोर संघ सलग दोनदा सर्वबाद झाला होता, परंतु या सामन्यात त्यांनी ९ गडी गमावले ही एकमेव त्यांच्यासाठी दिलासा देणारी बाब ठरली. सात धावांत २ बळी घेणाऱ्या पुणे संघाच्या ल्युकी फर्ग्युसनला सामनावीरचा पुरस्कार देणात आला.
पुणे संघाला माफक धावांत गुंडाळल्यानंतर विराट सेनेला आज सामना जिंकून आव्हान जिवंत ठेवण्याची संधी होती परंतु त्यांच्या फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे त्यांनी ती गमावली. पुणे संघाच्या शिस्तबध्द आणि भेदक माऱ्यापुढे आरसीबी ९६ धावापर्यंत मजल मारु शकले, विराट कोहली (४८ चेंडूत ५५ धावा) वगळता आरसीबीचा एकही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही. पुण्याकडून इम्रान ताहिरने ३ तर ल्युकी फर्ग्युसनने २ बळी घेतले.
तत्पूर्वी, नाणेफेकीचा कौल जिंकण्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार विराट कोहली याला यश आले, त्याने यजमान संघास फलंदाजीस पाचारण करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर अजिंक्य रहाणेच्या (६) रुपाने पुण्याने पहिला बळी गमावला. त्याचा जोडीदार राहुल त्रिपाठी मात्र नेहमीच्या आक्रमक मूडमध्ये होता. कर्णधार स्मिथने एक बाजू लावून धरुन त्याला फलंदाजीची मोकळीक दिली. पाचवे षटक घेवून आलेल्या एस अरविंदच्या पहिल्याच चेंडूला त्रिपाठीने लाँग आॅनच्या डोक्यावरुन प्रेक्षकांत भिरकावून दिले. दोघांनी सातव्या चेंडूवर संघाचे अर्धशतक फलकावर लावले. पण त्यानंतर पवन नेगीने त्रिपाठीला बाद आरसीबीला थोडी उसंत मिळवून दिली. कर्णधार स्मिथने ४५ धावा करुन संघाच्या धावसंख्येला आकार दिला. त्याला स्टुअर्ट बिन्नीने बाद केले. राहुल आणि स्मिथ यांची जमलेली जोडी फुटल्यानंतर मनोज तिवारी आणि महेंद्र सिंग धोनी यांनी ती कसर भरुन काढली. चौथ्या विकेटसाठी ३७ चेंडूत ४९ धावा जोडल्याने पुण्याचा स्कोर २0 षटकात ३ बाद १५७ असा आव्हानात्मक दिसू लागला.

आरसीबी शंभरात बाद
- २९ एप्रिल २०१७ रोजी पुणे येथे सुपर जायंटविरुद्ध ९ बाद ९६
- २३ एप्रिल २०१७ रोजी कोलकाता येथे केकेआरविरुद्ध ४९ धावांत गारद
- २६ एप्रिल २०१४ रोजी अब धाबी येथे राजस्थान रॉयल्सविरुद्ध ७० धावांत डाव संपुष्टात.
- २0 एप्रिल २००९ रोजी पोर्ट एलिजाबेथ येथे चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध ८७ धावांत संघ गारद.
- १८ एप्रिल २००८ रोजी बंगळुरू येथे केकेआरविरुद्ध सर्वबाद ८२.

संक्षिप्त धावफलक :
पुणे सुपरजायंट : अजिंक्य रहाणे झे. मिल्ने गो. बद्री ६, राहूल त्रिपाठी झे. जाधव गो. नेगी ३७, स्टीव्हन स्मिथ झे. मिल्ने गो. बिन्नी ४५, मनोज तिवारी नाबाद ४४, महेंद्रसिंग धोनी नाबाद २१; अवांतर ४, एकूण २० षटकांत ३ बाद १५७; गोलंदाजी : मिल्ने ४-०-३५-०, बद्री ४-०-३१-१, अरविंद ४-०-३०-०, चाहल २-०-२५-० , नेगी ४-०-१८-१, बिन्नी २-०-१७-१
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : ट्रॅव्हीस हेड त्रिफळा गो. उनाडकट २, विराट कोहली झे. बदली खेळाडू अगरवाल गो. ख्रिस्तीयन ५५, ए बी डिव्हीलियर्स झे. तिवारी गो. फर्ग्युसन ३, केदार जाधव धावचित (फर्ग्युसन / धोनी) ७, सचिन बॅबी झे. स्मिथ गो. वॉशिंग्टन २, स्टुअर्ट बिन्नी झे. वॉशिंग्टन गो. फर्ग्युसन १, पवन नेगी झे. ख्रिस्तीयन गो. ताहीर ३, अ‍ॅडम मिल्ने झे. स्मिथ गो. ताहिर ५, सॅम्युअल बद्री त्रिफळा गो. ताहिर २, श्रीनाथ अरविंद नाबाद ८, यजुवेंद्र चाहल नाबाद ४; अवांतर ४, एकूण २० षटकांत ९ बाद ९६; गोलंदाजी : चाहर २-०-१८-०, उनाडकट ४-०-१९-१, फर्ग्युसन ४-१-७-२, ख्रिस्तियन ४-०-२५-१, ताहिर ४-०-१८-३, वॉशिंग्टन २-०-७-१

Web Title: At the end of the RCB challenge?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.