भारताचे आव्हान संपुष्टात
By admin | Published: September 12, 2015 03:25 AM2015-09-12T03:25:24+5:302015-09-12T03:25:24+5:30
जपान बॅडमिंटन खुल्या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या आठव्या मानांकित पारुपल्ली कश्यप याला सहाव्या मानांकित चिनी तैपेईच्या च्यू तिएन चेन याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
तोक्यो : जपान बॅडमिंटन खुल्या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या आठव्या मानांकित पारुपल्ली कश्यप याला सहाव्या मानांकित चिनी तैपेईच्या च्यू तिएन चेन याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
कश्यपला चेन याने २१-१४, २१-१८ असा सरळसेटमध्ये सहज पराभूत करीत स्पर्धेच्या बाहेर काढले. कश्यप व चेन या पूर्वी तीन वेळा समोरा समोर आले आहेत. त्यात कश्यपने दोन वेळा बाजी मारली आहे. या स्पर्धेत कश्यपला लय साधता आली नाही. चेन याना जोरदार सुरुवात करीत लागोपाठ पाच गुण मिळवित कश्यपला जोरदार धक्का दिला. त्यानंतर कश्यपने पुनरागमन करीत काहीप्रमाणात प्रतिआक्रमण केले. एकवेळ ८-८ अशी बरोबरी देखील होती. मात्र चेनने पुन्हा आघाडी घेत कश्यपला संधी दिली नाही.
दुसऱ्या सेटमध्ये कश्यपने टक्कर देत ४-२ अशी आघाडी मिळविली. मात्र तो चेन याच्यावर दबाव निर्माण करण्यात अपयशी ठरला. चेनने पुन्हा ८-४ अशी आघाडी घेतली. एकवेळ कश्यप १८-२० असा पिछाडीवर
होता. मात्र तेन याने १ अंक मिळवित दुसऱ्या सेटसह सामना खिशात घातला.
या पराभवामुळे भारताचे या २ लाख ७५ हजार डॉलर पुरस्काराच्या स्पर्र्धेतील आव्हानदेखील संपुष्टात आले आहे. या स्पर्धेत कश्यप उपांत्यपूर्व फेरीत जाणारा एकमेव भारतीय खेळाडू होता. भारताची फुलराणी साईना नेहवाल दुसऱ्या फेरीतच स्पर्धेच्या बाहेर पडली होती. तसेच पी. व्ही. संधू, भारताची दुहेरीतील प्रसिद्ध जोडी ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा, अजय जयराम,
प्रदन्या गादरे, एन. सिक्की रेड्डी यांना देखील या स्पर्धेत आपला प्रभाव पाडता आला नाही. (वृत्तसंस्था)
मीज आज क्षमतेनुसार खेळ केला नाही. अनेकदा मी चुकीचे फटके मारले. तसेच काही प्रसंगात मी घेतलेले निर्णय देखील चुकीचे होते. त्याचा फटका मला बसला. दुसऱ्या फेरीत पुनरागमनासाठी मी जोरदार प्रयत्न केले. त्यात काहीप्रमाणात यशही मिळाले. मात्र तोपर्यंत सामना हातातून गेला होता. च्यू तिएन चेन याने या सामन्याच सुरेख खेळ केला.
- पारुपल्ली कश्यप,
बॅडमिंटनपटू