सायनाचे आव्हान संपुष्टात
By admin | Published: June 4, 2016 02:16 AM2016-06-04T02:16:22+5:302016-06-04T02:16:22+5:30
रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताची पदकाची सर्वांत मोठी आशा असलेल्या सायना नेहवालला इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत शुक्रवारी अव्वल मानांकित कॅरोलिना मारिनकडून
जकार्ता : रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताची पदकाची सर्वांत मोठी आशा असलेल्या सायना नेहवालला इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत शुक्रवारी अव्वल मानांकित कॅरोलिना मारिनकडून
२२-२४, ११-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे सायनाच्या आॅलिम्पिक तयारीला मोठा धक्का बसला आहे.
आठव्या मानांकित सायनाला ४७ मिनिटांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. या निकालासह भारताचे स्पर्धेतील अव्हान संपुष्टात आले. सायनाने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मारिनविरुद्ध पहिल्या गेममध्ये संघर्षपूर्ण खेळ केला; पण हा गेम गमाविल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये सायनाने मारिनविरुद्ध सपशेल शरणागती पत्करली. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या सायनाची मारिनविरुद्ध कारकिर्दीतील कामगिरी ४-३ अशी झाली आहे. सायना यंदाच्या मोसमात अद्याप जेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. इंडोनेशियन ओपनमध्ये मात्र सायनाचे स्वप्न पूर्ण झाले नाही.
सायनाला २०१६ मध्ये इंडिया ओपन सुपर सिरीज, मलेशिया सुपर सीरिज, स्विस ओपन ग्रांप्री आणि आशियन चॅम्पियनशिपमध्ये उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला. याव्यतिरिक्त आॅल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत सायनाला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला.
पहिल्या गेममध्ये उभय खेळाडूंदरम्यान संघर्षपूर्ण खेळ अनुभवाला मिळाला. सायना एकवेळ ७-१३ ने पिछाडीवर होती. त्यानंतर तिने सलग सहा गुण वसूल करीत
१६-१३ अशी आघाडी घेतली. सायनाने त्यानंतर १९-१६ अशी आघाडी घेतली होती; पण मारिनने १९-१९ अशी बरोबरी साधली. सायनाकडे २०-१९ आणि २२-२१ अशी दोनदा गेम पॉर्इंटची संधी होती, पण मारिनने सलग तीन गुण वसूल करीत पहिला गेम २४-२२ ने जिंकला.
पहिला गेम गमाविल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये सायनाला दुसऱ्या गेममध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. मारिनने ४-१, ७-३ आणि १७-९ अशी आघाडी घेतली आणि त्यानंतर २१-११ ने सहज गेम जिंकत विजयावर शिक्कामोर्तब केले. मारिनने या विजयासह उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले असून तेथे तिला चौथे मानांकन प्राप्त चीनची खेळाडू वांग यिहानच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.