सलामीच्या लढतीत इंग्लंडचा बांगलादेशवर विजय
By admin | Published: June 1, 2017 10:54 PM2017-06-01T22:54:17+5:302017-06-01T22:54:17+5:30
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीच्या लढतीत यजमान इंग्लंड संघाने बांगलादेशचा आठ विकेटने पराभव केला.
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 1 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीच्या लढतीत यजमान इंग्लंड संघाने बांगलादेशचा आठ विकेटने पराभव केला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने विजयासाठी ठेवलेले 306 धावांचे आव्हान इंग्लंडने दोन गड्यांच्या मोबदल्यात 47.2 षटकांत सहज पार केले. इंग्लंडकडून ज्यो रूटने सर्वाधिक 133* धावा केल्या. रुटने संघाच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडली. अॅलेक्स हेल्स(95) आणि कर्णधार इयॉन मॉर्गन (75*) यांनी अर्धशतकी खेळी करत रुटला चांगली साथ दिली. इंग्लंडची पहिली विकेट सहा धावांवर गेल्यानंतर हेल्स आणि रुटने संघाचा मोर्चा संभाळला. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी 25. 3 षटकात 159 धावांची भागीदारी केली. हेल्सचे शतक थोडक्या हुकले. तो 95 धावांवर बाद झाला. हेल्स बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या कर्णधार मॉर्गनने रुटच्या साथीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
त्यापूर्वी, इंग्लंडमधील ढगाळ वातावरणात सकाळच्या सत्रात चेंडू स्विंग होत असल्याने कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकताच प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेश संघाने सुरुवातीपासूनच सावध पवित्रा घेतली. तमिम इक्बाल आणि सोम्य सरकार यांनी 12 षटकांत 56 धावांची सलमी दिली. बांगलादेश संघाला चांगली सुरुवात मिळाली असे वाटत असतानाच मैदानावर स्थिरावलेल्या सौम्य सरकाला (28) बेन स्टोक्सने बाद केले. सौम्य सरकार बाद झाल्यानंतर आलेल्या इमरुल केयसला(19) स्थिरावण्यापूर्वी फ्लंकेटने बाद केले. 95 धावांवर बांगलादेशला दुसरा धक्का बसला. पण त्यानंतर तमिम इक्बाल (128) आणि मुशफिकूर रहीम (79) यांनी टिच्चून फलंदाजी केली. या दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना संधीच दिली नाही. तमिम इक्बाल आणि मुशफिकूर रहीम यांनी तिसऱ्या विकेटसाठी 166 धावांची भागिदारी करत संघाच्या धावसंखेला आकार दिला. 45 व्या षटकात तमिम इक्बाल बाद झाला आणि बांगलादेशच्या धावसंखेला ब्रेक लागला. या षटकात दोन्ही स्थिरावलेले फलंदाज बाद झाल्याने बांगलादेश संघाची धावसंखेला ब्रेक लागला. तमिमनंकतर त्याच षटकात मुशफिकूर बाद झाला. बांगलादेश संघाने 50 षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात 305 धावा केल्या. इंग्लंडकडून लायम प्लंकेटने 59 धावांत 4 गडी टिपले. बेन स्टोक्स आणि जॅक बॉलने प्रत्येकी 1-1 बळी टिपला