इंग्लंडला खडतर आव्हान
By admin | Published: February 14, 2015 12:28 AM2015-02-14T00:28:21+5:302015-02-14T00:28:21+5:30
विश्वचषकाच्या सुरुवातीलाच इंग्लंडला आॅस्ट्रेलियाचे खडतर आव्हान असेल. पारंपरिक प्रतिस्पर्धी आॅस्ट्रेलियाविरुद्ध त्यांचा रेकॉर्ड फारसे चांगले नाही.
मेलबोर्न : विश्वचषकाच्या सुरुवातीलाच इंग्लंडला आॅस्ट्रेलियाचे खडतर आव्हान असेल. पारंपरिक प्रतिस्पर्धी आॅस्ट्रेलियाविरुद्ध त्यांचा रेकॉर्ड फारसे चांगले नाही.
पहिल्या विश्वविजेतेपदासाठी आसुसलेल्या इंग्लंडला तिरंगी मालिकेतील अंतिम लढतीत सलग तीन पराभवांना सामोरे जावे लागले. एमसीसीवर पुन्हा एकदा ९० हजार प्रेक्षकांपुढे आॅस्ट्रेलियाविरुद्ध विजय नोंदविण्याचे आव्हान असेल. गेल्या १५ सामन्यांत इंग्लंडने आॅस्ट्रेलियाला केवळ दोनदा पराभूत केले. शिवाय तीनदा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागलेल्या इंग्लंडला १९९२ साली आॅस्ट्रेलियानेच धूळ चारून जेतेपदापासून दूर ठेवल्याचा इतिहास आहे. इंग्लंडला कठीण समजल्या जाणाऱ्या ‘अ’ गटात स्थान मिळाले. याच गटात १९९६ चा विजेता श्रीलंका आणि सहयजमान न्यूझीलंडचा समावेश आहे. आॅस्ट्रेलियाने २३ वर्षांआधी विश्वचषकाचे यजमानपद भूषविले, तेव्हा इंग्लंडनेच त्यांना उपांत्य फेरीत नमविले होते. त्या विजयापासून इंग्लंड प्रेरणा घेऊ शकतो.
आॅस्ट्रेलियन संघाला या सामन्यात कर्णधार मायकेल क्लार्कविना खेळावे लागेल. तो अनफिट आहे. तरीही इंग्लंडवर विजय नोंदवित सहा आठवडे चालणाऱ्या क्रिकेटच्या महाकुंभात शानदार सलामी देण्याचा आॅस्ट्रेलियाचा इरादा दिसतो. गेल्या १२ वन डेत केवळ एकच पराभव पचविणारा हा संघ ऐन विश्वचषकाच्या तोंडावर फॉर्ममध्ये परतला, असेच म्हणावे लागेल. गेल्या नोव्हेंबरमध्ये मायदेशात आॅस्ट्रेलियाने द. आफ्रिकेचा ४-१ ने पराभव केला. पाठोपाठ भारत आणि इंग्लंडवरही वर्चस्व गाजविले होते. इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गन स्वत: फलंदाजीत अपयशी ठरला. गेल्या चारपैकी तीन डावांत त्याला भोपळाही फोडता आला नव्हता. सराव सामन्यातही त्याला पुरेशी संधी मिळाली नाही. ‘शनिवारी दहा-वीस चेंडूंचा सामना करू शकलो तर उत्तम होईल. पाच सामन्यांआधी मी शतक झळकवले. चांगल्या कामगिरीसाठी केवळ एक उत्तम खेळीची गरज असेल,’ असे मॉर्गन म्हणाला. (वृत्तसंस्था)