इंग्लंड उपांत्य फेरीत
By admin | Published: March 27, 2016 01:11 AM2016-03-27T01:11:03+5:302016-03-27T01:11:03+5:30
जोस बटलरची वादळी खेळी आणि ख्रिस जॉर्डनने त्याच्या कारकिर्दीतील केलेल्या सर्वोत्तम कामगिरीने उतार-चढाव आलेल्या रोमहर्षक सामन्यात अँजोलो मॅथ्यूजच्या सुरेख
नवी दिल्ली : जोस बटलरची वादळी खेळी आणि ख्रिस जॉर्डनने त्याच्या कारकिर्दीतील केलेल्या सर्वोत्तम कामगिरीने उतार-चढाव आलेल्या रोमहर्षक सामन्यात अँजोलो मॅथ्यूजच्या सुरेख कामगिरीवर पाणी फेरले. त्याचबरोबर इंग्लंडने श्रीलंकेचा १0 धावांनी पराभव करीत आयसीसी विश्व टी-२0 च्या उपांत्य फेरीत धडक मारली. इंग्लंडच्या विजयाने दक्षिण आफ्रिकेचाही पत्ता कट झाला आहे.
विजयासाठी १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ ८ बाद १६१ या धावसंख्येपर्यंत मजल मारू शकला. श्रीलंकेची सुरुवात सनसनाटी झाली. पहिल्या तीन षटकांपर्यंत श्रीलंकेची स्थिती
४ बाद १५ अशी दयनीय झाली होती. त्यानंतर मॅथ्यूजने कर्णधाराला शोभेल अशी खेळी करताना ५४ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ७३ धावांची खेळी केली. तसेच त्याने चमारा कापुगेदरा (३0) याच्या साथीने पाचव्या गड्यासाठी ८0 धावांची भागीदारी केली; परंतु दबावात विकेट पडत गेल्या. जॉर्डनने २८ धावांत
४ आणि डेव्हिड विली याने २६ धावांत २ गडी बाद केले. या विजयामुळे इंग्लंड ग्रुप एकमधून वेस्ट इंडीजनंतर सेमीफायनल गाठणारा दुसरा संघ ठरला, तर श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशेवर पाणी फेरले गेले. इंग्लंडचे चार सामन्यांत ३ विजयांसह
६ गुण झाले आहेत, तर श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका संघांचे तीन सामन्यात फक्त २ गुण आहेत. त्याआधी जोस बटलर याच्या वादळी खेळीने इंग्लंडने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १७१ अशी मजबूत धावसंख्या उभारली.
फिरोजशाह कोटलाची खेळपट्टी थोडी संथ वाटत होती; परंतु त्यावरही गवत होते. त्यामुळे फलंदाजांजवळ मोठे फटके खेळण्याची पुरेशी संधी होती. बटलरने ३७ चेंडूंत ८ चौकार, २ षटकारांसह नाबाद ६६ धावा केल्या आणि यादरम्यान कर्णधार इयॉन मॉर्गन (२२) याच्या साथीने चौथ्या गड्यासाठी ७४ धावांची भागीदारी केली. त्याआधी सलामीवीर जेसन राय (३९ चेंडूंत ४२ धावा) आणि जो रुट (२५) यांनी दुसऱ्या गड्यासाठी ६१ धावांची भागीदारी करीत सुरुवातीच्या धक्क्यातून इंग्लंडला सावरले होते.
श्रीलंका संघासाठी अँजलो मॅथ्यूज आणि दोन्ही फिरकी गोलंदाज रंगना हेराथ (२७ धावा१ बळी), जेफ्री वंडारसे (२६ धावांत २ बळी) यांनी टिच्चून मारा केला. या तिघांनी एकूण १२ षटकांत फक्त ७८ धावा दिल्या; परंतु अन्य गोलंदाजांनी आठ षटकांत ९३ धावा प्रतिस्पर्धी संघाला दिल्या.
हेराथने दुसऱ्याच षटकात अॅलेक्स हेल्सला पायचीत करीत इंग्लंडला सुरुवातीलाच जोरदार धक्का दिला; परंतु त्यानंतर राय आणि रुट यांनी सहजतेने धावा करताना खराब चेंडूची प्रतीक्षा केली. पॉवरप्ले संपल्यानंतर इंग्लंडची स्थिती १ बाद ३८ अशी होती.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : २0 षटकात ४ बाद १७१. (बटलर नाबाद ६६, राय ४२, मॉर्गन २२, जो रुट २५. वंडारसे २/२६, हेराथ १/२७)
श्रीलंका : २0 षटकात ८ बाद १६१. (मॅथ्यूज नाबाद ७३, कापुगेदारा ३0, थिसारा परेरा २0, दासुन शनाका १५. जॉर्डन ४/२८, विली २/२६, प्लंकेट १/२३).