कसोटी संघापेक्षा हा इंग्लंड संघ वेगळा...
By admin | Published: January 15, 2017 04:27 AM2017-01-15T04:27:30+5:302017-01-15T04:27:30+5:30
गेल्या महिन्यात कसोटी मालिकेत सहज विजय मिळवला त्याप्रमाणे वन-डे मालिकाही सहज जिंकता येईल, असा विचार जर यजमान संघ करीत असेल तर त्यांच्यावर आश्चर्यचकित होण्याची
- सुनील गावसकर लिहितो...
गेल्या महिन्यात कसोटी मालिकेत सहज विजय मिळवला त्याप्रमाणे वन-डे मालिकाही सहज जिंकता येईल, असा विचार जर यजमान संघ करीत असेल तर त्यांच्यावर आश्चर्यचकित होण्याची वेळ येऊ शकते. २०१५ च्या वन-डे विश्वकप स्पर्धेत साखळी फेरीत गारद होणाऱ्या संघाच्या तुलनेत हा इंग्लंड संघ फार वेगळा आहे. इंग्लंड संघामध्ये त्यानंतर झपाट्याने सुधारणा झाली. त्याचे श्रेय इयोन मॉर्गनला द्यायलाच हवे. मॉर्गनच्या नेतृत्वाखाली संघात कमालीचा बदल झाला. मॅक्युलमच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघात जसा बदल घडला तसाच बदल मॉर्गनच्या नेतृत्वात इंग्लंड संघात झालेला दिसून येत आहे. संघातील या बदलाचे श्रेय कर्णधाराला मिळायलाच हवे.
विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर इंग्लंड संघाने ब्रँडन मॅक्युलमच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाविरुद्ध पहिली मालिका खेळली होती. त्या मालिकेत त्यांनी न्यूझीलंड संघाच्या शैलीचा कित्ता गिरवण्याचा प्रयत्न केला. त्यात ते कमालीचे यशस्वी ठरले. त्यांनी केवळ न्यूझीलंड संघाचा पराभवच केला असे नाही तर मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलागही केला. सुरुवातीच्या काळात मोठ्या लक्ष्यापुढे इंग्लंड संघ ढेपाळत होता. मॉर्गनच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंड संघामध्ये कमालीचा बदल झाला. प्रतिकूल परिस्थितीत इंग्लंड संघ केवळ विजय मिळविण्यात यशस्वी ठरत आहे असे नाही तर ते चाहत्यांचे मनोरंजन करण्यातही यशस्वी ठरत आहेत. या मालिकेत काय घडते, हे दिसेलच, पण जून महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०१९ च्या आयसीसी विश्वकप स्पर्धेत इंग्लंड संघाने विजेतेपद पटकावले नाही तर काहीतरी गंभीर चूक झाली असल्याचे स्पष्ट होईल. गेल्या मोसमात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी असलेल्या खेळपट्ट्यांप्रमाणे या मालिकेतही खेळपट्ट्या असतील तर भारतीय गोलंदाजांसाठी ही मालिका खडतर राहील. खेळपट्ट्या फिरकीला अनुकूल असतील तर अश्विन व जडेजाच्या उपस्थितीत भारतीय संघाला संधी राहील. दोन सराव सामन्यांत भारतीय संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यात चांगला असल्याचे निदर्शनास आले आहे. (पीएमजी)