थरारक विजयासह इंग्लंड महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 09:54 PM2017-07-18T21:54:54+5:302017-07-18T22:10:23+5:30
यजमान इंग्लंडने शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक उपांत्य लढतीत दक्षिण आफ्रिकेवर दोन विकेट्सनी मात करत महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत
Next
ऑनलाइन लोकमत
ब्रिस्टॉल, दि. १८ - यजमान इंग्लंडने शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक उपांत्य लढतीत दक्षिण आफ्रिकेवर दोन विकेट्सनी मात करत महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आज झालेल्या उपांत्य लढतीत दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या २१९ धावांच्या आव्हानाचा इंग्लंडने शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर यशस्वीरीत्या पाठलाग केला. आता अंतिम लढतीत इंग्लंडची गाठ भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य लढतीतील विजेत्याशी पडेल.
आज दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर लौरा व्होल्वार्डत (६६) आणि मिंगोन डू प्रेझ (नाबाद ७६) यांनी सुरेख अर्धशतके फटकावत संघाला दोनशेपार मजल मारून दिली. मात्र या दोघींव्यतिरिक्त अन्य फलंदाजांना चांगला खेळ करता न आल्याने दक्षिण आफ्रिकेचा धावगतीला ब्रेक लागला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला निर्धारित ५० षटकात सहा बाद २१८ धावांपर्यंतच मजल मारता आली.
या आव्हानाचा पाठलाग करताना विनफिल्ड आणि बेन्मोंट यांनी इंग्लंडला आश्वासक सुरुवात करून दिली. त्यानंतर सारा टेलरच्या (५४) अर्धशतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने विजयाच्या दिशेने कूच केली. मात्र मोक्याच्या क्षणी धडाधड विकेट्स पडल्याने सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला. जेनी गन ( नाबाद २७) हिने एक बाजू लावून धरली. तर अन्या श्रुब्सोले हिने शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर खणखणीत चौकार ठोकत इंग्लंडला थरारक विजय मिळवून दिला.