आफ्रिकेसमोर इंग्लंडचे आव्हान
By admin | Published: December 26, 2015 02:46 AM2015-12-26T02:46:25+5:302015-12-26T02:46:25+5:30
भारताकडून पराभूत झालेला द. आफ्रिका संघ आणि पाकिस्तानकडून मार खाणारा इंग्लंड संघ आज शनिवारपासून सुरू होत असलेल्या चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत
डरबन : भारताकडून पराभूत झालेला द. आफ्रिका संघ आणि पाकिस्तानकडून मार खाणारा इंग्लंड संघ आज शनिवारपासून सुरू होत असलेल्या चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत परस्परांपुढे येणार आहेत. दोन्ही संघांचे लक्ष्य विजयासह मालिकेत आघाडी मिळविण्याचे असेल.
कसोटी क्रमवारीत नंबर वन असलेल्या द. आफ्रिकेला टीम इंडियाकडून ०-३ ने पराभवाचा धक्का बसला. दुसरीकडे इंग्लंडला पाकने यूएईत कसोटी मालिकेत ०-२ ने पराभूत केले होते. उभय संघात दिग्गज मॅचविनर्सचा भरणा असल्याने पहिला सामना जिंकून मालिकेत कशी आघाडी मिळविता येईल, यासाठी उभय संघांनी डावपेच आखले आहेत.
यजमान संघ हाशिम अमलाच्या नेतृत्वात आव्हान सादर करेल. इंग्लंडची भिस्त फॉर्ममध्ये असलेल्या अॅलिस्टर कूक याच्या खांद्यावर आहे. मंद खेळपट्टीवर दोन्ही संघ ढेपाळतात हा इतिहास आहे. फिरकी माऱ्यापुढे धावा काढण्यासाठी संघर्ष करण्याची वृत्ती दोन्ही संघांच्या फलंदाजांमध्ये पहायला मिळते. पण येथे जलद आणि उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर धावा काढून सामना जिंकण्याचा उभय संघ प्रयत्न करतील.
खराब फलंदाजीने ग्रासलेल्या द. आफ्रिका संघाला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अॅण्डरसन खेळणार नसल्याने दिलासा लाभला असावा. अॅण्डरसन मांसपेशी ताणल्या गेल्याने बाहेर आहे. द. आफ्रिका संघाचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन मात्र दुखापतीतून सावरून संघात परतला. त्याच्या आगमनामुळे संघाची गोलंदाजी भक्कम झाली. दौऱ्यावर आलेल्या इंग्लिश संघाने देखील दोन्ही सराव सामन्यात सुरेख कामगिरी करीत आपण कडवे आव्हान देण्यास आलो असल्याचे संकेत दिले.
द. आफ्रिका संघाच्या फलंदाजीची जबाबदारी एबी डिव्हिलियर्स याच्यावर असेल. इंग्लंडसाठी धावा करण्याची मुख्य भिस्त अॅलिस्टर कूक याच्यावर राहील. सामन्याच्या पूर्वसंध्येला बोलताना यजमान कर्णधार अमला म्हणाला,‘ भारतातील निराशाजनक कामगिरी विसरून येथे नव्याने सुरुवात करण्यास सज्ज आहोत. त्यासाठी एक विजय हवा आहे. नव्या उत्साहाने इंग्लंडला पराभूत करू यात शंका नाही.’
इंग्लंड : अॅलेक्स हेल्स, निक कॉम्पटन, ज्यो रूट, जेम्स टेलर,बेन स्टोक्स,जॉनी बेएरेस्टो, मोईन अली, ख्रिस वोक्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि स्टीव्हन फिन.