इंग्लंडची आज ‘दुहेरी’ सेमीफायनल

By admin | Published: March 30, 2016 02:56 AM2016-03-30T02:56:31+5:302016-03-30T02:56:31+5:30

आत्मविश्वास उंचावलेल्या न्यूझीलंड संघाला आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेत बुधवारी पहिल्या उपांत्य लढतीत इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. न्यूझीलंडला फिरकीपटू

England's 'double' semifinal today | इंग्लंडची आज ‘दुहेरी’ सेमीफायनल

इंग्लंडची आज ‘दुहेरी’ सेमीफायनल

Next

नवी दिल्ली : आत्मविश्वास उंचावलेल्या न्यूझीलंड संघाला आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेत बुधवारी पहिल्या उपांत्य लढतीत इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. न्यूझीलंडला फिरकीपटू मिशेल सँटनर व ईश सोढी यांच्याकडून पुन्हा एकदा चमकदार कामगिरीची आशा आहे. या स्पर्धेत न्यूझीलंडच्या फिरकीपटूंनी वर्चस्व गाजविले आहे.
न्यूझीलंड प्रबळ दावेदार न्यूझीलंड संघाला २०१० च्या चॅम्पियन इंग्लंड संघाविरुद्ध विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. विश्वविजेतेपदापासून अद्याप वंचित असलेला न्यूझीलंड संघ यावेळी जेतेपद पटकावण्यास उत्सुक आहे. न्यूझीलंड जेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला, तर दिवंगत मार्टिन क्रो याला विद्यमान संघातील मार्टिन गुप्तील, रॉस टेलर व ग्रॅन्ट इलियट यांच्यासारख्या खेळाडूंकडून श्रद्धांजली ठरेल.
या खेळाडूंचे माजी कर्णधार मार्टिन क्रोसोबत सलोख्याचे संबंध होते. न्यूझीलंड संघाचे नेतृत्व केन विलियम्स्सारखा दिग्गज खेळाडू करीत आहे. परिस्थितीनुसार व्यूहरचना आखण्यात आणि आवश्यक ते बदल करण्यास सज्ज असलेल्या विलियम्सनच्या नेतृत्वामुळे न्यूझीलंड संघ साखळी फेरीत अपराजित राहिला आहे.
फिरकीपटू वर्चस्व
गाजविण्याची शक्यता
न्यूझीलंडच्या या स्पर्धेतील वाटचालीमध्ये डावखुरा फिरकीपटू सॅन्टनर व लेग स्पिनर सोढी यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. सॅन्टनरने १५ षटकांत ८६ धावांच्या मोबदल्यात ९ बळी घेतले आहेत, तर सोढीने १५.४ षटकांत केवळ ७८ धावा बहाल करताना आठ फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखविला आहे. अष्टपैलू ग्रॅन्ट इलियट व डावखुरा वेगवान गोलंदाज मिशेल मॅक्लेनाघन यांनी अनुक्रमे तीन व चार बळी घेत त्यांना योग्य साथ दिली आहे. न्यूझीलंडने चार लढतीत तीन वेळा प्रतिस्पर्धी संघांचा डाव गुंडाळण्यात यश मिळविले आहे. (वृत्तसंस्था)

प्रत्येक मैदानावर वर्चस्व
न्यूझीलंडने चार वेगवेगळ्या मैदानांवर विजय साकारला आहे. फिरकीला अनुकूल नागपूरच्या खेळपट्टीवर भारताचा ४७ धावांनी पराभव केला तर धरमशालामध्ये न्यूझीलंडने आॅस्ट्रेलियाविरुद्ध आठ धावांनी सरशी साधली. मोहालीमध्ये फलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर पाकिस्तानचा २२ धावांनी पराभव केल्यानंतर न्यूझीलंडने कोलकाता येथे बांगलादेशविरुद्ध ७५ धावांनी दिमाखदार विजय मिळविला. ट्रेन्ट बोल्ट व टीम साउदी यांच्यासारख्या अव्वल वेगवान गोलंदाजांना या स्पर्धेत अद्याप खेळण्याची संधी मिळाली नाही, यावरून न्यूझीलंड संघाच्या वर्चस्वाची कल्पना येते. न्यूझीलंड संघात आॅफ स्पिनर नॅथन मॅक्युलमचाही समावेश आहे. इंग्लंड संघातील बेन स्टोक्स, कर्णधार इयन मोर्गन व मोईन अली यांची उपस्थिती बघता न्यूझीलंडचा कर्णधार विलियम्सन मॅक्युलमला आणखी एक संधी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. न्यूझीलंडसाठी फलंदाजी चिंतेचा विषय आहे. त्यांना केवळ एकदा दीडशेपेक्षा अधिक धावांची मजल मारता आली. न्यूझीलंडने कामगिरीत सातत्य राखण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या पाकिस्तानविरुद्ध ही कामगिरी केली होती. वैयक्तिक कामगिरीचा विचार करता आतापर्यंत केवळ गुप्तिलला (१२५ धावा) शंभरपेक्षा अधिक धावा फटकावता आल्या.

इंग्लंडसाठी ‘कोटला’ लकी
इंग्लंडने फिरोजशाह कोटला मैदानावर दोन सामने खेळले असून त्याचा त्यांना उपांत्य लढतीत निश्चितच लाभ मिळू शकतो. वेस्ट इंडीज व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन लढतीत इंग्लंड संघाची फलंदाजी उल्लेखनीय ठरली होती; पण अफगाणिस्तानविरुद्ध त्यांना संघर्ष करावा लागला होता. श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत बटलरने आक्रमक खेळी करीत इंग्लंडला दमदार मजल मारून दिली होती. अफगाणिस्तानविरुद्ध फिरकीपटू आदिल रशीद व मोईन अली यांनी संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती, तर श्रीलंकेविरुद्ध डेथ ओव्हर्समध्ये जॉर्डन व स्टोक्स यांनी चांगला मारा केला होता. जो रुटची या स्पर्धेतील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. त्याच्या ८३ धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विक्रमी २३० धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता. बटलरने श्रीलंकेविरुद्ध आक्रमक अर्धशतकी खेळी केली होती, तर ख्रिस जॉर्डन व बेन स्टोक्स यांनी डेथ ओव्हर्समध्ये अचूक मारा केला होता.

सांघिक कामगिरीने बाजी मारू : मॉर्गन
आम्हाला कुठलीच बाब नव्याने सांगण्याची गरज भासली नाही. आम्ही प्रत्येक खेळाडूंना प्रतिभा दाखविण्याची संधी दिली. सांघिक कामगिरीच्या जोरावर आम्ही वर्चस्व गाजविण्यात यशस्वी ठरलो. मी केवळ उपांत्य फेरीच्या लढतीबाबत विचार करीत आहे. न्यूझीलंडसारख्या मजबूत संघाविरुद्ध बुधवारी लढत द्यायची आहे. न्यूझीलंडने या स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवण्यासाठी आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. मनोधैर्य कायम राखणे आणि दडपण न बाळगणे ही २०१० च्या विजेत्या संघात व सध्याच्या संघात समानता आहे.
- इयान मॉर्गन, कर्णधार, इंग्लंड

विराटकडून शिकता येईल : विलियम्सन
कोहली व रूट शानदार फलंदाजी करीत आहेत. मला दोन्ही खेळाडू आवडतात. त्यांची कामगिरी उल्लेखनीय असून, त्यांच्याकडून बरेच काही शिकता येईल. मी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. योग्य रणनीती आखणे व मैदानावर त्याची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. आतापर्यंत आम्ही त्यात यशस्वी ठरलो. आम्ही प्रतिस्पर्धी संघ आणि परिस्थिती बघून संघाची निवड करतो. दिग्गज खेळाडू निवृत्त झाले असले तरी सांघिक कामगिरीच्या जोरावर यश मिळवणे शक्य असते. आमच्या संघात ट्रेन्ट बोल्ट आणि टीम साउदी यांना खेळण्याची संधी मिळालेली नाही. खेळपट्टी बघितल्यानंतर सर्वोत्तम संघ निवड करण्यावर भर असतो.
-केन विलियम्सन, कर्णधार, न्यूझीलंड

जेफ क्रो, डेव्हीड बून उपांत्य लढतीचे रेफ्री
दिल्लीमध्ये बुधवारी आॅस्ट्रेलिया व इंग्लंड महिला संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या उपांत्य लढतीत ख्रिस गॅफनी व एस. रवी पंच राहतील, तर जोएल विल्सन तिसरे तर रेनमोर मार्टिनेज चौथे पंच राहतील. जेफ क्रो सामनाधिकारी म्हणून भूमिका बजावतील. दिल्लीमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड पुरुष संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या उपांत्य लढतीत कुमार धर्मसेना व रॉड टकर पंचांची भूमिका बजावतील. ब्रुस आॅक्सनफोर्ड तिसरे तर जोएल विल्सन चौथे पंच असतील. डेव्हिड बून सामनाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळतील.

संघ यातून निवडणार
न्यूझीलंड : केन विलियम्सन (कर्णधार), कोरे अ‍ॅन्डरसन, ट्रेंट बोल्ट, मार्टिन गुप्तिल, ग्रांट इलियट, कोलिन मुन्रो, मिशेल मॅक्लेगन, नाथन मॅक्यूलम, अ‍ॅडम मिल्ने, हेन्री निकोल्स, ल्यूक रोंची, मिशेल सेंटनेर,
ईश सोढी, टिम साउदी, रॉस टेलर.

इंग्लंड : इयोन मोर्गन (कर्णधार), जासन राय, जेम्स विंस, अ‍ॅलेक्स हेल्स, ज्यो रुट, मोईन अली, जोस बटलर, बेन स्टोक्स, सॅम बिलिंग्स, डेव्हिड विले, लियॉम प्लंकेट, रीके टोपले, क्रिस जोर्डन, आदिल रशीद, लियाम डॉसन.

फिरोजशहा कोटला, नवी दिल्ली
सायं. ७.०० पासून

Web Title: England's 'double' semifinal today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.