इंग्लंडचा सहज विजय
By admin | Published: December 31, 2015 03:27 AM2015-12-31T03:27:03+5:302015-12-31T03:27:03+5:30
मोईन अली व स्टिव्हन फिनच्या अचूक माऱ्याच्या जोरावर इंग्लंडने किंग्समेड मैदानावर बुधवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी संपलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण
डरबन : मोईन अली व स्टिव्हन फिनच्या अचूक माऱ्याच्या जोरावर इंग्लंडने किंग्समेड मैदानावर बुधवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी संपलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा २४१ धावांनी पराभव केला. उभय संघांदरम्यान दुसरा कसोटी सामना केपटाऊनच्या न्यूलँडस् मैदानावर शनिवारपासून खेळला जाणार आहे.
आॅफस्पिनर मोईन अलीने आज बुधवारी सकाळच्या सत्रात तीन बळी घेतले. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाने अखेरच्या ६ विकेट केवळ ३८ धावांच्या मोबदल्यात गमावल्या. इंग्लंडने दिलेल्या ४१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १७४ धावांत संपुष्टात आला. वेगवान गोलंदाज स्टिव्हन फिनने ४२ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले.
दक्षिण आफ्रिका संघाने कालच्या ४ बाद १३६ धावसंख्येवरून पुढे खेळताना आज तिसऱ्याच चेंडूवर एबी डीव्हिलियर्सची (३७) विकेट गमावली. डीव्हिलियर्सला मोईन अलीने तंबूचा मार्ग दाखवला. मोईनने त्यानंतरच्या षटकात तिसऱ्या चेंडूवर तेंबा बवुमाला (०) खाते उघडण्यापूर्वीच माघारी पाठविले. दक्षिण आफ्रिका संघाने मंगळवारी अखेरच्या षटकात फाफ डू प्लेसिसची विकेट गमावली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने धावसंख्येत भर न घालता तीन विकेट गमावल्या. धावसंख्येत दोन धावांची भर पडली असता फिनने नाईट वॉचमन डेल स्टेनचा (२) त्रिफळा उडवत दक्षिण आफ्रिकेची ७ बाद १३८ अशी अवस्था केली. मोईन अलीने केली एबोटला (२) बाद करीत दिवसातील वैयक्तिक तिसरा बळी नोंदवला. स्टुअर्ट ब्रॉडने मोर्ने मॉर्केलला (८) पायचित करीत इंग्लंडला विजय मिळवून दिला. जेपी ड्युमिनी २६ धावा काढून नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिका संघाचा गेल्या पाच सामन्यांतील हा चौथा पराभव ठरला. दक्षिण आफ्रिका संघाला भारतात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ०-३ ने पराभव पत्करावा लागला. सामन्यात ११६ धावांच्या मोबदल्यात ७ बळी घेणारा मोईन अली सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. फिनने या लढतीत सहा, तर ब्रॉडने पाच विकेट घेतल्या. (वृत्तसंस्था)
धावफलक :
इंग्लंड : पहिला डाव ३०३. दक्षिण आफ्रिका : पहिला डाव २१४. इंग्लंड : दुसरा डाव ३२६. दक्षिण आफ्रिका : दुसरा डाव (कालच्या ४ बाद १३६ धावसंख्येवरून पुढे) : डीव्हिलियर्स पायचित गो. अली ३७, स्टेन त्रि. गो. फिन ०२, बवुमा यष्टिचित बेअरस्टॉ गो. अली ०, ड्युमिनी नाबाद २६, एबोट पायचित गो. अली ०२, पीट झे. टेलर गो. व्होक्स ०, मॉर्केल पायचित गो. ब्रॉड ०८. अवांतर : (५). एकूण : ७१ षटकांत सर्व बाद १७४. बाद क्रम : १-५३, २-८५, ३-८८, ४-१३६, ५-१३६, ६-१३६, ७-१३८, ८-१४३, ९-१५५, १०-१७४. गोलंदाजी : ब्रॉड : १३-५-२९-१, व्होक्स : १०-५-२५-१, फिन : १५-६-४२-४, स्टोक्स : ७-१-२६-१, अली : २६-९-४७-३.