द. आफ्रिकेकडून इंग्लंडचा सफाया
By admin | Published: February 23, 2016 03:16 AM2016-02-23T03:16:04+5:302016-02-23T03:16:04+5:30
काइल अॅबोटचे ३ बळी आणि अॅबी डिव्हिलियर्स व हाशिम आमला यांची १२५ धावांची सलामी या बळावर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडविरुद्ध दुसरा ट्वेंटी-२0 सामना ९ गडी राखून जिंकताना दोन
जोहान्सबर्ग : काइल अॅबोटचे ३ बळी आणि अॅबी डिव्हिलियर्स व हाशिम आमला यांची १२५ धावांची सलामी या बळावर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडविरुद्ध दुसरा ट्वेंटी-२0 सामना ९ गडी राखून जिंकताना दोन सामन्यांची मालिका २-0 अशी जिंकली व इंग्लंडचा सफाया केला.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीची संधी दिली. त्यानंतर पाहुण्या संघाने १९.४ षटकांत १७१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान संघाने ३२ चेंडू राखून फक्त १ गडी गमावत १४.४ षटकांत १७२ धावा करीत विजय मिळवला.
दक्षिण आफ्रिकेकडून डिव्हिलियर्सने तडाखेबंद फलंदाजी करताना २९ चेंडूंत ६ चौकार आणि ६ षटकारांची उधळण करताना ७१ धावा ठोकल्या. अमलाने ३८ चेंडूंत ८ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ६९ धावा केल्या. या दोघांनी सलामीसाठी १२५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. डिव्हिलियर्सला आदिल रशीदने जो रुटकरवी झेलबाद करीत दक्षिण आफ्रिकेला पहिला व एकमेव धक्का दिला.
अमलाने दुसऱ्या विकेटसाठी कर्णधार फाफ डू प्लेसिस याच्या साथीने ४७ धावांची नाबाद भागीदारी करीत संघाला विजय मिळवून दिला. प्लेसिसने ३१ चेंडूंत २ चौकार मारत नाबाद २0 धावांचे योगदान दिले.
त्याआधी इंग्लंडच्या पाच फलंदाजांना दुहेरी आकडी धावसंख्यादेखील गाठता आली नाही. त्यांच्याकडून रुटने ३४, कर्णधार इयॉन मॉर्गनने ३८ आणि यष्टिरक्षक जोस बटलरने ५४ धावांची खेळी करताना इंग्लंडचा डाव सावरला. बटलरने २८ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकार मारले.
दक्षिण आफ्रिकेकडून अॅबोटने २६ धावांत ३ गडी बाद केले. कॅगिसो रबादाने २८ आणि ख्रिस मॉरीसने ३३ धावांत प्रत्येकी २ गडी बाद केले. इम्रान ताहीरने १ गडी बाद केला. ताहीर मालिकावीर, तर डिव्हिलियर्स सामनावीर किताबाचा
मानकरी ठरला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : १९.४ षटकांत सर्वबाद १७१. (जोस बटलर ५४, जो रुट ३४, मॉर्गन ३८, अॅबोट ३/२६, कॅगिसो २/२८, मॉरिस २/३३).
दक्षिण आफ्रिका : १४.४ षटकांत १ बाद १७२. (डिव्हिलियर्स ७१, अमला नाबाद ६९, आदिल रशीद १/३0)