इंग्लंडचा पहिला विजय
By admin | Published: February 24, 2015 12:18 AM2015-02-24T00:18:30+5:302015-02-24T00:18:30+5:30
मोईन अलीच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने ‘अ’ गटात सोमवारी खेळल्या गेलेल्या लढतीत स्कॉटलंडचा ११९ धावांनी पराभव करीत विश्वकप
क्राईस्टचर्च : मोईन अलीच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने ‘अ’ गटात सोमवारी खेळल्या गेलेल्या लढतीत स्कॉटलंडचा ११९ धावांनी पराभव करीत विश्वकप स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. अलीच्या १२८ धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने ८ बाद ३०३ धावांची मजल मारली आणि प्रत्युत्तरात खेळणाऱ्या स्कॉटलंड संघाचा डाव ४२.२ षटकांत १८४ धावांत गुंडाळला. आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड संघांविरुद्ध पराभव स्वीकारणाऱ्या इंग्लंड संघाला मनोधैर्य उंचावण्यासाठी दिमाखदार विजयाची गरज होती, पण स्कॉटलंडसारख्या तुलनेने कमकुवत असलेल्या संघाविरुद्ध त्यांना लौकिकाला साजेसा विजय मिळविता आला नाही.
इंग्लंड संघ एकवेळ २ बाद २०२ अशा दमदार स्थितीत होता. त्या वेळी इंग्लंड संघ विशाल धावसंख्या उभारणार, असे वाटत होते. अली व इयान बेल (५४) यांनी सलामीला १७२ धावांची विक्रमी भागीदारी केली. इंग्लंडने त्यानंतर १५ षटकांत १०२ धावांच्या मोबदल्यात ६ विकेट गमाविल्या. अली दुसऱ्या षटकात सुदैवी ठरला. फ्रेडी कोलमॅनला
त्याचा झेल टिपण्यात अपयश आले. स्विंग गोलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर अलीने आक्रमक फलंदाजी केली. त्याने १०७ चेंडूंना सामोरे जाताना १२८ धावा फटकाविल्या. त्यात १२ चौकार व ५ षटकारांचा समावेश आहे. बेल यालाही डावाच्या सुरुवातीला जीवदान लाभले.
अॅलेस्डेयर इव्हान्सच्या गोलंदाजीवर त्याच्याविरुद्धचे पायचितचे अपील पंचांनी फेटाळले. स्कॉटलंड संघाने त्याविरुद्ध अपील केले नाही, पण रिप्लेमध्ये चेंडू डाव्या यष्टीवर असल्याचे स्पष्ट झाले. बेलला रिची बॅरिंग्टनने तंबूचा मार्ग दाखविला. अलीला आॅफस्पिनर मजीक हकने बाद केले. अली बाद झाल्यानंतर इंग्लंडने १० चेंडू व २ धावांच्या अंतरात तीन विकेट गमाविल्या. गॅरी बॅलन्स (१०) व ज्यो रुट (१) यांना मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे इंग्लंडची ४ बाद २०३ अशी स्थिती झाली.
जेम्स टेलर (१७) व जोस बटलर (२४) व कर्णधार इयान मॉर्गन (४६) यांनी इंग्लंडला ३०० चा पल्ला ओलांडून दिला. स्कॉटलंडतर्फे जोश डावेने १० षटकांत ६८ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले.
विजयासाठी ३०४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलंड संघातर्फे सलामीवीर कोएत्जरने ८४ चेंडूंना सामोरे जाताना ११ चौकारांच्या सहाय्याने ७१ धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त अन्य फलंदाजांना छाप सोडता आली नाही. प्रेस्टन मोम्मसेन (२६) व कोएत्जर यांनी चौथ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. ही भागीदारी ज्यो रुटने संपुष्टात आणली. त्यानंतर स्कॉटलंडचा डाव गडगडला. इंग्लंडतर्फे स्टिव्हन फिनने २६ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. (वृत्तसंस्था)