इंग्लंडच्या आशा कायम
By admin | Published: March 24, 2016 01:34 AM2016-03-24T01:34:14+5:302016-03-24T01:34:14+5:30
मोईन अलीच्या नाबाद ४१ धावा पाठोपाठ गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्याच्या बळावर इंग्लंडला टी-२० विश्वचषकात विजयाची संजीवनी मिळाली.
नवी दिल्ली : मोईन अलीच्या नाबाद ४१ धावा पाठोपाठ गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्याच्या बळावर इंग्लंडला टी-२० विश्वचषकात विजयाची संजीवनी मिळाली. बुधवारी येथे झालेल्या सामन्यात इंग्लंडने अफगाणिस्तानचा कडवा प्रतिकार मोडून काढून १५ धावांनी विजयाची चव चाखली. या विजयानंतर संघाच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम आहेत.
सुरुवातीला झालेल्या पडझडीतून सावरून इंग्लंडने ७ बाद १४२ पर्यंत आव्हानातमक मजल गाठली. नंतर अफगाण संघाला ९ बाद १२७ धावांत रोखून सामना जिंकला. इंग्लंडचा तीन सामन्यातील हा दुसरा विजय आहे. अफगाणिस्तान सलग तीन पराभवानंतर स्पर्धेबाहेर पडला. अफगाणच्या सुरुवातीच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या माऱ्यापुढे धैर्य दाखविले असते तर विजय सोपा झाला असता. अफगाणिस्तानने गेल्या दोन सामन्यात १५० वर धावा केल्या. शिवाय द. आफ्रिकेविरुद्ध त्यांनी १७२ चा आकडा गाठला होता. या सामन्यात मात्र त्यांचा अर्धा संघ केवळ ३९ धावांत परतला. मोहम्मद शहजाद ४, कर्णधार असगर स्टानेकजई १, गुलबदिन नायब शून्य हे झटपट परतले. राशिद खान १५ आणि नूर अली १७ धावांवर नाबाद राहीला.
तळाचे समीउल्ला शेनवारी याने २७ चेंडूत २२, दौलत जादरानने दहा चेंडूत १४ आणि शफिकउल्लाह सदक याने २० चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ३५ धावा ठोकून सामना रोमहर्षक स्थितीत आणला होता. पण आघाडीच्या फळीची हाराकिरी अफगाणला महागात पडली. विली, रशिदने प्रत्येकी दोन तर जॉर्डन, मोईन व स्टोक्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.(वृत्तसंस्था)
धावफलक
इंग्लंड :- जेसन रॉय त्रि. गो. हमजा ०५, जेम्स विस झे. व गो. नबी २२, जो रुट धावाबद १२, इयोन मॉर्गन त्रि. गो. नबी ००, बेन स्टोक्स त्रि. गो. रशिद ०७, जोस बटलर झे. नबी गो. शेनवारी ०६, मोईन अली नाबाद ४१, ख्रिस जॉर्डन झे. व गो. राशिद १५, डेव्हिड विली नाबाद २०. अवांतर (१४). एकूण २० षटकांत ७ बाद १४२. बाद क्रम : १-१६, २-४२, ३-४२, ४-४२, ५-५०, ६-५७, ७-८५. गोलंदाजी : अमिर हमजा ४-०-४५-१, शापूर जॉर्डन ४-०-३४-०, मोहम्मद नबी ४-०-१७-२, समीउल्ला शेनवारी ४-०-२३-१, राशिद खान ४-०-१७-२.
अफगाणिस्तान :-मोहम्मद शहजाद पायचित गो. विली ०४, नुरअली जादरान झे. व गो. राशिद १७, असगर स्टॅनिकजई झे. रुट गो. जादरान ०१, गुल्वादिन नायब झे. स्टोक्स गो. विली ००, राशिद खान झे. मोर्गन गो. अली १५, मोहम्मद नबी झे. जॉर्डन गो. राशिद १२, समीउल्ला शेनवारी झे. रुट गो. स्टोक्स २२, नजीबुल्ला जादरान धावबाद १४, शफीकउल्ला नाबाद ३५, आमिर हमजा अली धावबाद ०१, शापूर जादरान नाबाद ००. अवांतर (६). एकूण २० षटकांत ९ बाद १२७. बाद क्रम : १-४, २-१२, ३-१३, ४-३५, ५-३९, ६-६४, ७-८५, ८-९४, ९-१०८. गोलंदाजी : विली ४-०-२३-२, जॉर्डन ४-०-२७-१, प्लंकेट ४-१-१२-०, अली २-०-१७-१, राशिद ३-०-१८-२, स्टोक्स ३-०-२८-१.