कुकने दिला इंग्लंडच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा
By admin | Published: February 7, 2017 02:39 AM2017-02-07T02:39:04+5:302017-02-07T02:39:04+5:30
अॅलिस्टर कुक याने सोमवारी इंग्लंडच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. विक्रमी ५९ कसोटी सामन्यांत संघाचे कर्णधारपद भूषविणाऱ्या कुकने हा निराशाजनक दिवस
लंडन : अॅलिस्टर कुक याने सोमवारी इंग्लंडच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. विक्रमी ५९ कसोटी सामन्यांत संघाचे कर्णधारपद भूषविणाऱ्या कुकने हा निराशाजनक दिवस असल्याचे सांगताना संघासाठी योग्य निर्णय असल्याचे म्हटले आहे.
इंग्लंडतर्फे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या कुकने (११,०५७ धावा) आॅगस्ट २०१२मध्ये कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्याने मायदेशात २०१३ व २०१५मध्ये खेळल्या गेलेल्या अॅशेस मालिकेत नेतृत्व करताना संघाला चषक पटकावून दिला होता. त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने भारतात व दक्षिण आफ्रिकेत मालिका विजय साकारला.
३२ वर्षीय कुक म्हणाला, ‘‘इंग्लंडचे कर्णधारपद भूषविणे आणि गेल्या ५ वर्षांत ही जबाबदारी सांभाळणे सन्मानाची बाब आहे. कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय कठोर होता; पण वैयक्तिक व संघाचा विचार करता हा निर्णय योग्य वेळी घेतला असल्याची मला कल्पना आहे.’’
यॉर्कशायरचा फलंदाज जो रुट कर्णधारपदाचा प्रबळ दावेदार असून, आगामी १५ दिवसांमध्ये याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. कुकने २०१० ते २०१४ या कालावधीत विक्रमी ६९ वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांत इंग्लंडचे नेतृत्व केले. तो इंग्लंडतर्फे सर्वाधिक कसोटी सामन्यांत नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणारा कर्णधार आहे. त्याने यापूर्वीच्या कर्णधारांच्या तुलनेत सर्वाधिक कसोटी शतके ठोकली आहेत. त्याची २०१२मध्ये ‘विस्डन क्रिकेटर आॅफ दि ईयर’साठी निवड झाली होती. २०१३मध्ये तो आयसीसी विश्व कसोटी संघाचा कर्णधार होता.
कुकने आपल्या पदाचा राजीनामा इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाचे चेअरमन कोलिन ग्रेव्स यांच्याकडे रविवारी सोपविला होता. कुक कसोटी क्रिकेट खेळणे सुरू ठेवणार आहे.
कुक म्हणाला, ‘‘वैयक्तिक विचार करता, अनेक प्रकारे हा माझ्यासाठी दु:खद दिवस आहे; पण मी ज्या खेळाडूंचे नेतृत्व केले, त्यांचे आभार मानतो. सर्व प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, इंग्लंडचे समर्थक आणि देश-विदेशात आमचे समर्थन करणारी बार्मी-आर्मी या सर्वांचे मी विशेष आभार मानतो.’’
कुकने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय गेल्या वर्षअखेर भारतात इंग्लंडला ४-० ने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर घेतला होता. ईसीबीने म्हटले आहे, की इंग्लंडचा पुढील कसोटी कर्णधार ठरविण्यासाठी योग्य प्रक्रिया सुरू झालेली आहे.
कुकचे योगदान उल्लेखनीय असून, देशातील महान कर्णधारांपैकी तो एक आहे. आता आम्ही योग्य उमेदवाराच्या शोधासाठी प्रक्रियेला गती देणार आहोत. अधिकृत व अनधिकृतपणे अनेक खेळाडू कर्णधारपदाची भूमिका सांभाळत आहेत. २२ फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडीजला संघ रवाना होण्यापूर्वी याबाबत घोषणा होण्याची आशा आहे.
- अॅण्ड्य्रू स्टॉस, संचालक इंग्लंड क्रिकेट
५९ पैकी २४ कसोटी सामन्यात कुकच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंड संघ विजयी झाला आहे.
२२ कसोटी सामन्यात कुकच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंडचा संघ पराभूत झाला आहे.
४८४४ धावा कर्णधार म्हणून कुकने केल्या आहेत. या यादीत त्याचा सहावा क्रमांक लागतो.
२८ पैकी १६ कसोटी सामने मायदेशात कुकच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंडने जिंकले आहेत. या यादीत त्याचा अँड्यू स्ट्रॉस (१९ कसोटी विजय) आणि मायेकल वॉन ( १७ कसोटी विजय) यांच्या नंतर तिसरा क्रमांक लागतो.
0५ शतके कुकने कर्णधार झाल्यानंतर पहिल्या पाच कसोटी झळकावली आहेत.
असा विक्रम करणारा जगातील एकमेव कर्णधार आहे.