नेपोमनियाची याच्यावर मात करीत आनंद आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 01:44 AM2017-08-11T01:44:35+5:302017-08-11T01:44:41+5:30
पाच वेळेसचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदने सिंकफिल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत रशियाच्या इयान नेपोमनियाची याला नमवत संयुक्तरीत्या आघाडी घेतली.
सेंट लुई (अमेरिका) : पाच वेळेसचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदने सिंकफिल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत रशियाच्या इयान नेपोमनियाची याला नमवत संयुक्तरीत्या आघाडी घेतली. आनंदने पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळताना सलग दुसºया विजयाची नोंद केली. त्याचे सातव्या फेरीअखेर ४.५ गुण झाले आहेत. आता या सुपर टुर्नांमेंटच्या फक्त दोन फेऱ्या बाकी आहेत आणि भारतीय दिग्गज आनंद कालपर्यंत आघाडीवर असणाºया फ्रान्सच्या मॅक्साइम वॉचियर लाग्रेव्ह आणि आर्मोनियाच्या लेवोन आरोनियनसह संयुक्त आघाडीवर पोहोचला आहे.
आनंद आणि नेपोमनियाची यांच्यातील लढत ४० चालींत संपली. पहिल्या फेरीच्या विजयानंतर आरोनियनची कामगिरी चांगली झाली नव्हती; परंतु सलग दोन विजयानंतर तो सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने अमेरिकेच्या हिकारू नकामुरा याला पराभूत केले. अन्य लढती ड्रॉ राहिल्या. वॉचियर लाग्रेव्ह आणि रशियाचा सर्गेई कार्जाकिन तसेच नॉर्वेचा विश्वचॅम्पियन मॅग्नस कार्लसन याने रशियाच्या पीटर श्वेडलरसोबतची लढत बरोबरीत सोडविली.
कार्लसनचे सध्या चार गुण असून, त्याची आता आरोनियनशी लढत होणार आहे. फॅबियानो कारुआना याला त्याच्याच देशाच्या अमेरिकेच्या वेस्ली सो याच्याविरुद्धची लढत बरोबरीत सोडविण्यात फारशी अडचण भासली नाही. (वृत्तसंस्था)