प्रो कबड्डीमुळे राष्ट्रीय संघात प्रवेश सुकर
By admin | Published: February 11, 2016 02:05 AM2016-02-11T02:05:56+5:302016-02-11T02:05:56+5:30
दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत (सॅग) स्टार खेळाडू देशाकडून खेळत असल्याने प्रो कबड्डीच्या पुणे येथील लढतीत या खेळाडूंची उणीव भासेल. विशेष म्हणजे यामध्ये यू मुंबाचा स्टार डिफेंडर
- रोहित नाईक, कोलकाता
दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत (सॅग) स्टार खेळाडू देशाकडून खेळत असल्याने प्रो कबड्डीच्या पुणे येथील लढतीत या खेळाडूंची उणीव भासेल. विशेष म्हणजे यामध्ये यू मुंबाचा स्टार डिफेंडर आणि लालबाग - परळचा अस्सल मुंबईकर विशाल माने याचाही समावेश आहे. प्रो कबड्डीमुळे माझा राष्ट्रीय संघातील प्रवेश सुकर झाला; आणि आता देशासाठी खेळण्यास खूप उत्सुक असल्याचे विशालने ‘लोकमत’ला सांगितले.
जेव्हापासून कबड्डी खेळण्यास सुरुवात केली तेव्हापासून भारतीय संघाचे लक्ष्य बाळगले होते, असे विशाल म्हणाला. त्याचप्रमाणे पुण्यात लीग खेळता येणार नाही, मात्र शेवटी देश महत्त्वाचा असून भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचे मुख्य लक्ष्य आहे. आमच्या अनुपस्थितीत यू मुंबातील इतर खेळाडू आपापली जबाबदारी निश्चितच यशस्वीरीत्या पार पाडतील, असेही विशालने म्हटले.
यू मुंबाच्या आतापर्यंतच्या वाटचालीबद्दल विशाल म्हणाला, लौकिकानुसार आमची सुरुवात झाली नाही. यू मुंबाने आपला संघ कायम ठेवण्यावर भर दिला. यावेळी बहुतेक आक्रमक खोलवर चढाया करण्याचे टाळत असून वरच्यावर खेळ करीत आहेत. आता आम्ही प्रत्येक खेळाडूचा अभ्यास केला आहे.
स्टार खेळाडू संघात नसल्याचा यू मुंबावर कोणताही फरक पडणार नाही. सर्व संघ विजयासाठी सज्ज असून, नवोदितांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. ते या संधीचा नक्कीच फायदा उचलतील. प्रशिक्षकांनी संघाच्या बचावावर अधिक भर दिला असून, राकेश कुमार, शब्बीर बापू, रिशांक देवाडिगा आणि जीवा कुमार या अनुभवी खेळाडूंवर अधिक मदार असेल.- विशाल माने