भारतापुढे बरोबरीचे आव्हान

By Admin | Published: January 15, 2016 02:25 AM2016-01-15T02:25:33+5:302016-01-15T02:25:33+5:30

सलामीच्या लढतीत मोठी धावसंख्या उभारल्यानंतरही पराभवाचा सामना करावा लागल्याने टीम इंडियाने बोध घेतलेला दिसतो. आज (शुक्रवारी) गाबा मैदानावर खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या

Equal challenge with India | भारतापुढे बरोबरीचे आव्हान

भारतापुढे बरोबरीचे आव्हान

googlenewsNext

ब्रिस्बेन : सलामीच्या लढतीत मोठी धावसंख्या उभारल्यानंतरही पराभवाचा सामना करावा लागल्याने टीम इंडियाने बोध घेतलेला दिसतो. आज (शुक्रवारी) गाबा मैदानावर खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून बरोबरी साधण्यासाठी आॅस्ट्रेलियाविरुद्ध गोलंदाजीत सुधारणा करावीच लागेल. छोटीशी चूक घडली तरी सामन्यात परतणे कठीण होईल, याची जाणीव भारताला झाली असावी.
विजयासाठी ३१० धावांचा पाठलाग करणाऱ्या आॅस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात भारताला ५ गड्यांनी नमवून मालिकेत १-०ने आघाडी घेतली आहे. वाका मैदानावर भारतीय गोलंदाजी सपशेल ढेपाळली. आश्विन आणि जडेजा हे फिरकी गोलंदाज महागडे ठरले. ईशांत शर्मा फिट झाल्याने धोनी भुवनेश्वरऐवजी ईशांतला संधी देऊ शकतो. वाकाची खेळपट्टी अपेक्षेनुरूप मंद होती; पण गाबाच्या खेळपट्टीवर धोनी ४ वेगवान गोलंदाजांसह खेळू शकतो. पर्थमध्ये डावखुरा वेगवान गोलंदाज बरिंदर सरन याने लक्ष वेधले. त्याने ५६ धावांत ३ गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात त्याच्याकडून पुनरावृत्तीची अपेक्षा राहील. दुसरीकडे, भुवनेश्वर आणि यादव यांनी भरपूर धावा मोजल्या.
भारतीय संघ स्मिथच्या खेळीमुळे धास्तावला आहे. त्याने १४९ धावा ठोकून विजय साकारला होता. गेल्या काही सामन्यांत त्याच्या नाबाद १६२, १३३, २८, १९२, १४, ११७, ४७, १०५, आणि १४९ अशी खेळी राहिली. पाच सामन्यांच्या मालिकेत आॅस्ट्रेलियावर सरशी साधायची असल्यास स्मिथला आवरण्याचे अवघड आव्हान भारतीय गोलंदाजांपुढे असेल. दुसरा शतकवीर जॉर्ज बेली हादेखील धोकादायक फलंदाज आहे. याशिवाय, फॉर्ममध्ये असलेला उस्मान ख्वाजा व मधल्या फळीसाठी अष्टपैलू जॉन हेस्टिंग्ज यांना पाचारण करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)

संघ यातून निवडणार
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, गुरकिरत मान, रिषी धवन, आर. आश्विन, रवींद्र्र जडेजा, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा, उमेश यादव व बरिंदर सरन.
आॅस्ट्रेलिया : स्टीह स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, अ‍ॅरोन फिंच, जॉर्ज बेली, जॉन हेस्टिंग्स, ग्लेन मॅक्सवेल, जेम्स फॉल्कनर, मॅथ्यू वेड, जोश हेजलवूड, जोएल पेरिस, स्कॉट बोलँड, शॉन मार्श व केन रिचर्डसन.

मधल्या षटकांत विकेट घेणे शिकावे लागेल : रोहित
ब्रिस्बेन : पहिल्या सामन्यात शतक झळकावल्यानंतरही गोलंदाजांनी मधल्या टप्प्यातील खेळात गडी बाद करण्यात चुकारपणा केल्यामुळे पराभवाची वेळ आली. यातून बोध घेऊन आॅस्ट्रेलियावर विजय मिळविण्यासाठी मधल्या षटकांत गोलंदाजांनी यजमान फलंदाजांवर दडपण आणण्याची कला अवगत करावी, असे सलामीचा फलंदाज रोहित शर्मा याने म्हटले आहे.
पर्थवर आम्ही ३००चा पल्ला गाठला ही सकारात्मक बाब होती;
पण गोलंदाजांनी बचाव न केल्याने आॅस्ट्रेलियाला आवर घालण्यात
अपयश आले, असे सांगून विजयासाठी मधल्या टप्प्यात बळी घेऊन दडपण निर्माण करण्याची संघाला गरज असल्याचे मत रोहितने व्यक्त केले.

गाबा मैदानावरील खेळपट्टी सपाट असेल; पण वाकाच्या तुलनेत येथे चढाओढ राहील. ब्रिस्बेनमध्येदेखील धावांचा पाऊस पडण्याची शक्यता नाकाराता येत नाही. पहिल्या सामन्यात सर्वच गोलंदाजांची धुलाई झाली. येथे तसे घडणार नाही. आम्ही सामन्यागणिक डावपेच आखत असल्याने विजयासाठी खेळणार आहोत.
- जेम्स फॉल्कनर, अष्टपैलू खेळाडू.

सामन्याची वेळ सकाळी ८.५० पासून

Web Title: Equal challenge with India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.