भारतापुढे बरोबरीचे आव्हान

By admin | Published: March 3, 2017 08:32 PM2017-03-03T20:32:38+5:302017-03-03T22:44:39+5:30

आत्मविश्वास उंचावलेल्या आॅस्ट्रेलियापुढे आज शनिवारपासून सुरू होत असलेली दुसरी कसोटी विराट कोहली अ‍ॅन्ड कंपनीची कठीण परीक्षा घेणारी असेल.

Equal challenge with India | भारतापुढे बरोबरीचे आव्हान

भारतापुढे बरोबरीचे आव्हान

Next
ऑनलाइन लोकमत
बेंगळुरू, दि. 03 - आत्मविश्वास उंचावलेल्या आॅस्ट्रेलियापुढे आज शनिवारपासून सुरू होत असलेली दुसरी कसोटी विराट कोहली अ‍ॅन्ड कंपनीची कठीण परीक्षा घेणारी असेल. हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचे अवघड आव्हान असल्याने दडपण भारतावरच आहे.
घरच्या मैदानावर सुरुवातीच्या सामन्यात पराभवाचा धक्का बसल्यानंतर बॅकफुटवर येण्याची वेळ भारतीय संघावर अभावानेच आली आहे. त्यामुळे चिंता आणि सावधपणा या दोन्ही बाबींचे भान राखून विजय मिळवायचा आहे. पुण्याच्या खेळपट्टीवर ओकिफीच्या फिरकीपुढे नतमस्तक झालेल्या भारतावर ३३३ धावांनी पराभूत होण्याची वेळ येताच १९ सामन्यांच्या विजयी परंपरेला खीळ बसली. या पराभवातून शहाणपणा शिकून नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. अनिल कुंबळेच्या मार्गदर्शनात चेन्नईच्या खेळपट्टीवर विजय नोंदवित चार सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारतीय खेळाडू प्रयत्नांची पराकाष्ठा करतील यात संशय नाही. त्यासाठी फिरकीपटू नाथन लियोन आणि ओकिफीसोबतच वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क आणि जोश हेजलवूड यांचा मारा शिताफीने खेळावाच लागेल. शिवाय आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याला लवकर गुंडाळण्याचे तंत्र शोधावे लागणार आहे. स्मिथने पुण्याच्या खेळपट्टीवर दुसºया डावात शतक झळकविले होते. पुण्यात अश्विन आणि जडेजा निष्प्रभ ठरले. त्यांना क्षेत्ररक्षकांचीही साथ लाभली नव्हती. डीआरएसचा देखील भारताला उपयोग करता आला नाही.
नाणेफेकीचा कौल दुसºया सामन्यात महत्त्वपूर्ण ठरणार असून लढवय्या कर्णधार अशी ओळख असलेल्या कोहलीला आॅस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर तुटून पडण्याशिवाय पर्याय नाही. पहिल्या दिवशी खेळपट्टी कशी वागते यावर पुढील चार दिवसांच्या खेळाचे भाकीत अवलंबून असेल. बेंगळुरूत रविवारी पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. याआधी द. आफ्रिकेविरुद्ध याच खेळपट्टीवर झालेल्या कसोटीत केवळ दोनच दिवसांचा खेळ शक्य झाला होता. तीन दिवस पाऊस कोसळला.
गेल्या काही वर्षांत भारतीय संघाने ‘बेंच स्ट्रेंग्थ’ सुधारले असल्याने दुसरी कसोटी जिंकण्यासाठी कुठले संयोजन राहील हे पाहणे रंजक ठरणार आहे. धोनीकडून नेतृत्वाचा वारसा स्वीकारणा-या कोहलीने ज्या २४ सामन्यात नेतृत्व केले त्यापैकी अनेक सामन्यात वेगवेगळे संयोजन पहायला मिळाले. या सामन्यातही एक-दोन बदल शक्य आहेत. कोहली सातत्याने पाच गोलंदाजांना खेळविण्यावर भर देत आहे. त्याचे हे डावपेच गेल्या पाच महिन्यात यशस्वी देखील ठरले.तिहेरी शतकवीर करुण नायरला अतिरिक्त फलंदाज या नात्याने संधी मिळू शकते. नायरची निवड झाल्यास जयंत यादव बाहेर बसेल. नायर खेळल्यास भारताला चार तज्ज्ञ गोलंदाजांसह उतरावे लागेल.अश्विन, जडेजा आणि उमेश यादव यांना स्वाभाविक पसंती असेल पण ईशांत किंवा भुवनेश्वर यांच्यापैकी एकाचा विचार झाल्यास भुवीला पसंती राहील. कोच अनिल कुंबळे यांनी अंतिम ११ खेळाडू सांगण्यास मात्र नकार दिला आहे. अजिंक्य रहाणेवर धावा काढण्याचा दबाव असेल.
दुसरीकडे आॅस्ट्रेलिया मात्र पुण्यातील विजयी संघ येथेही कायम ठेवणार आहे. प्रतिभावान फलंदाज मॅट रेनशॉ फिट आहे. खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल असेल तर डेव्हिड वॉर्नरला देखील लाभ होईल. तो कोहलीसारखा नैसर्गिक आक्रमक खेळाडू आहे. 
 
उभय संघ
भारत :  विराट कोहली (कर्णधार),लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिद्धिमान साहा (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, उमेश यादव, ईशांत शर्मा, अभिनव मुकुंद, करुण नायर, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव .
आॅस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ(कर्णधार),मॅट रेनशॉ, डेव्हिड वार्नर, शॉन मार्श,  पीटर हॅन्डस्कॉम्ब, मिशेल मार्श, मॅथ्यू वेड (यष्टिरक्षक), मिशेल स्टार्क, नाथन लियोन, जोश हेजलवूड, स्टीव ओकिफी, ग््लेन मॅक्सवेल, मिशेल स्वेपसन, उस्मान ख्वाजा, जॅक्सन बर्ड आणि एस्टन एगर.
 
आॅस्ट्रेलियाचा ‘मार्इंड गेम’!
बेंगळुरु: सलामी लढतीत दारुण पराभवानंतर भारत दबावात असल्याचे वक्तव्य करीत आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने दुसºया कसोटीपूर्वी ‘मार्इंड गेम ’ खेळण्याचा प्रयत्न केला. भारताचा कर्णधार विराट कोहली याने हे वक्तव्य फेटाळून लावले असून आम्ही सहज खेळणार असे ठासून सांगितले.
भारत माघारला असल्याने विजयासाठी त्यांच्यावर दबाव असेल असे स्मिथ म्हणाला तर कोहलीने स्मिथच्या वक्तव्य हसून टाळले. तो म्हणाला,‘मी हसतो आहे. संपूर्ण संघ तयारीला लागला.’ मी तुम्हाला दबावात दिसतो का, असा त्याने पत्रकारांना उलट प्रश्न केला. प्रतिस्पर्धी संघाचे ते विचार असून शकतात. ते काय करीत आहेत, याचा विचार करण्यापेक्षा कौशल्यावर भर देणे गरजेचे असल्याचे कोहलीचे मत होते. 
 
पुण्यातील खराब कामगिरीची पुनरावृत्ती नाही: कोहली
‘‘ पुण्यातील अपमानास्पद पराभवातून आम्ही धडा घेतला. अशा खराब कामगिरीची पुनरावृत्ती होणार नाही, याबद्दल मी आश्वस्त करतो.इच्छाशक्तीच्या अभावामुळे पुण्यात पानिपत झाले हे कबुल आहे. आॅस्ट्रेलियाने सरस खेळ केला हे मान्य करावेच लागेल. अहंकार बाळगल्यामुळे इतर सामन्यांवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळेच पराभवातून शहाणपणा शिकायलाच हवा. पुढील तयारीसाठी आधीसारखाच सराव करण्यात आला. यात कुठलाही बदल नाही. अंतिम ११ जणांच्या संघात मात्र काही आश्चर्यकारक बदल करणार आहोत. कसोटी जिंकण्यासाठी २० गडी बाद करावे लागतील. त्यादृष्टीने विचार करीत आहोत. आमच्यावर विजयाचे दडपण आहे हे मात्र मला मान्य नाही. दबावापेक्षा कौशल्यावर लक्ष केंद्रित केल्यास विजय मिळेल, याची मला जाणिव आहे.’’
 
ते झाले तो भूतकाळ, आता  नव्याने सुरुवात: स्मिथ
‘‘पुण्यातील विजयामुळे मनोबळ उंचावले असूव पुण्यातील विजय भूतकाळात जमा झाला आहे. बेंगळुरुन नव्याने सुरुवात करावी लागेल. भारत दमदारपणे मुसंडी मारण्याचा प्रयतन करेल, यात शंका नाही. भारतीय संघ घरच्या मैदानावर चांगलाच खेळतो. त्यादृष्टीने आम्ही अधिकवेळ फलंदाजी करीत पहिल्या डावात धावडोंगर उभारण्याचा प्रयत्न करू. चिन्नास्वामीची खेळपट्टी दरदिवशी बदलत जाणार असून नंतर फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल होईल.या सामन्यात संघात फार बदल होण्याची शक्यता नाहीच.दोन वेगवान गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू आणि दोन चांगले फिरकी गोलंदाज असे संघात मिश्रण असेल. नाणेफेक जिंकल्यास प्रथम फलंदाजी पसंत असेल.’’
 
ठिकाण -  चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
सामन्याची वेळ: सकाळी ९.३० पासून
 

 

Web Title: Equal challenge with India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.