परफेक्ट ‘टेन’सह भारताची मालिकेत बरोबरी
By admin | Published: June 21, 2016 02:17 AM2016-06-21T02:17:16+5:302016-06-21T02:17:16+5:30
भारताने सोमवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेचा १० गडी व ४१ चेंडू राखून पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
हरारे : बरिंदर सरन (४-१०) व बुमराह (३-११) यांच्या भेदक माऱ्यानंतर मनदीप सिंग (नाबाद ५२ धावा, ४० चेंडू, ६ चौकार, १ षटकार) व के. एल. राहुल (नाबाद ४७ धावा, ४० चेंडू, २ चौकार, २ षटकार) यांच्या चमकदार फलंदाजीच्या जोरावर भारताने सोमवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेचा १० गडी व ४१ चेंडू राखून पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
भारताने झिम्बाब्वेचा डाव ९ बाद ९९ धावांत रोखला आणि विजयासाठी आवश्यक धावा १३.१ षटकांत गडी न गमावता पूर्ण केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मनदीप व के. एल. राहुल यांनी सलामीला १०३ धावांची अभेद्य भागीदारी करीत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
त्याआधी, वेगवान गोलंदाज बरिंदर सरन (१० धावांत ४ बळी) आणि जसप्रीत बुमराह (११ धावांत ३ बळी) यांच्या भेदक माऱ्यापुढे झिम्बाब्बेचा डाव ९ बाद ९९ धावांत रोखला गेला.
पदार्पणाची लढत खेळणारा वेगवान गोलंदाज सरनने भारतातर्फे टी-२० क्रिकेटमध्ये दुसरी सर्वोत्तम कामगिरी करताना ४ षटकांत १० धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनच्या नावावर टी-२० मध्ये ८ धावांत ४ बळींची नोंद आहे. हा भारतीय विक्रम आहे.
सरनने डावाच्या पाचव्या षटकात झिम्बाब्वेच्या तीन फलंदाजांना बाद केले. एकाच षटकात तीन फलंदाजांना बाद करणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी अशी कामगिरी अशोक डिंडाने केली आहे. सरनने या षटकात हेमिल्टन मस्कादजा (१०), सिकंदर रजा (१) आणि टीनोतेंदा मुतोमबोद््जी (०) यांना बाद केले. सरनने झिम्बाब्वेचा सलामीवीर चामू चिभाभा (१०) याला तिसऱ्या षटकात बाद केले होते. सरनने आघाडीच्या पाचपैकी चार फलंदाजांना माघारी परतवले. (वृत्तसंस्था)
विजयाचे श्रेय गोलंदाजांना : धोनी
हरारे : कर्णधार महेंद्रसिंह धोनी सोमवारी गोलंदाजांच्या कामगिरीवर खूश होता. गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने सोमवारी खेळलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यांत झिम्बाब्वेचा १० गडी राखून पराभव केला. धोनी म्हणाला, ‘‘हा शानदार विजय आहे. गोलंदाजांनी विजयाची मजबूत पायाभरणी केली होती. आमच्यासाठी सुरुवात महत्त्वाची होती. गोलंदाजांनी अचूक मारा केला. या खेळपट्टीवर तिसरी लढत असल्यामुळे मला चिंता सतावत होती. आम्ही नाणेफेकीचा कौल मिळवला असता, तर फलंदाजी स्वीकारली असती. ’’तो पुढे म्हणाला, ‘‘गोलंदाजांच्या कामगिरीला क्षेत्ररक्षकांची योग्य साथ लाभली. टी-२० क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण चांगले होणे महत्त्वाचे असते.’’ १० धावांच्या मोबदल्यात चार बळी घेणारा सरन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. सरन म्हणाला, ‘‘चेंडू स्विंग होत होता. कुठलेच दडपण नव्हते. मी वेगापेक्षा चेंडू स्विंग करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले. खेळपट्टी गोलंदाजीला अनुकूल होती.’’
पराभूत संघाचा कर्णधार क्रेमर म्हणाला, ‘‘आमची सुरुवात संथ झाली आणि मोक्याच्या क्षणी आम्ही विकेट गमावल्या. मालिकेत शानदार सुरुवातीनंतर हे निराशाजनक होते. खेळपट्टी थोडी वेगळी होती. केवळ ९९ धावा फटकाविल्यानंतर पराभव स्पष्ट दिसत होता. बुधवारी अंतिम लढत होणार असून, मालिका जिंकण्याची संधी आहे.’’
वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी आणि फिरकीपटू युजवेंद्र चहल यांनी अनुक्रमे ३२ व १९ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी एक बळी घेतला. बुमराहने झिम्बाब्वेतर्फे सर्वाधिक ३१ धावा करणाऱ्या पीटर मूर याला १५ व्या षटकात माघारी परतवले. त्यानंतर १७ व्या षटकात एल्टन चिगुम्बुरा (८) व नेव्हिल मद््िजव्हा (१) यांना बोल्ड केले. कुलकर्णीने कर्णधार ग्रीम क्रेमर (४) व चहलने मॅल्कम वॉलरला (१४) तंबूचा मार्ग दाखवला. डोनाल्ड तिरिपानो ११ धावा काढून नाबाद राहिला.
मूरने ३२ चेंडूंना सामोरे जाताना २ चौकार व १ षटकार ठोकला. पहिला टी-२० सामना जिंकणाऱ्या झिम्बाब्वे संघाला सरनच्या एका षटकातील तीन धक्क्यानंतर सावरता आले नाही. त्यांचा डाव ९ बाद ९९ धावांत रोखल्या गेला.
भारताचा ‘यॉर्कर मॅन’ बुमराहने चार षटकांत
११ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. त्याने
१७व्या षटकात
दोन फलंदाजांना क्लीनबोल्ड केले.
धावफलक
झिम्बाब्वे :- सी. चिभाभा झे. रायडू गो. सरन १०, एच. मसाकाजा त्रि. गो. सरन १०, पी. मूर झे. पटेल गो. बुमराह ३१, एस. रजा झे. राहुल गो. सरन ०१, सी. मुतोम्बोजी पायचीत गो. सरन ००, एम. वालेर झे. पटेल गो. चहल १४, एल्टन चिगुम्बुरा त्रि.गो. बुमराह ०८, ए. क्रेमर झे. रायडू गो. कुलकर्णी ०४, एन. मेडजिव्हा त्रि. गो. बुमराह ०१, डी. तिरिपानो नाबाद ११, टी. मुजाराबानी नाबाद ००. अवांतर (९). एकूण २० षटकांत ९ बाद ९९. बाद क्रम : १-१४, २-२६, ३-२८, ४-२८, ५-५७, ६-७५, ७-८१, ८-८३, ९-९१. गोलंदाजी : सरन ४-०-१०-४, कुलकर्णी ४-०-३२-१, पटेल ४-०-२३-०, चहल ४-१-१९-१, बुमराह ४-०-११-३.
भारत :- के. एल. राहुल नाबाद ४७, मनदीप नाबाद ५२. अवांतर (४). एकूण १३.१ षटकांत बिनबाद १०३. गोलंदाजी : तिरिपानो ३-०-११-०, मेडजिव्हा २.१-०-१९-०, मुजाराबानी २-०-१७-०, क्रेमर ३-०-२४-०, चिभाभा २-०-२३-०, रजा १-०-९-०.