भारताचा एसो एल्बेन जगात अव्वल; विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी जिंकले पदक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 01:38 PM2019-08-17T13:38:37+5:302019-08-17T13:38:54+5:30
एसो एल्बेन- हे नाव कदाचित ऐकलेही नसेल.
-ललित झांबरे
एसो एल्बेन- हे नाव कदाचित ऐकलेही नसेल. परिचयाचे असण्याचा तर प्रश्नच नाही आणि नावावरून हा खेळाडू भारतीय आहे असे वाटण्याचीही शक्यता नाही पण हा खेळाडू भारतीयच असून आपल्या अंदमान-निकोबारचा आहे आणि विश्वास ठेवा, सायकलिंगच्या ज्युनियर गटाच्या क्रमवारीत तो जगात नंबर वन आहे. एवढंच नाही तर या खेळाडूने लागोपाठ दुसऱ्या वर्षी भारताला विश्व अजिंक्यपद सायकलिंग स्पर्धेत पदक जिंकून दिले आहे.
गेल्या वर्षी 16 ऑगस्टला त्याने भारताला सायकलिंगचे पहिले आंतरराष्ट्रीय पदक जिंकून दिले होते. त्यावेळी स्वीत्झर्लंडमधील ऐगल येथे किरीन स्पर्धाप्रकारात तो रौप्य पदक विजेता ठरला होता आणि आता यंदा 15 ऑगस्ट रोजी म्हणजे स्वातंत्र्य दिनी जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे सायकलींगच्या याच प्रकारात त्याने विश्व अजिंक्यपद स्पर्धेचे कास्यपदक जिंकले आहे. अवघ्या 17 आणि 18 वर्षे वयात त्याने हे यश मिळवलेय. गेल्यावेळच्या रौप्यपदकाने त्याला स्प्रिंट सायकलिंगच्या ज्युनियर गटात नंबर वन बनवले होते. हे नंबर वन स्थान त्याने टिकवून ठेवलेले आहे. हे सर्वोच्च स्थान गाठणारा तो पहिलाच भारतीय आहे.
Esow wins bronze! 🥉
— SAIMedia (@Media_SAI) August 15, 2019
More good news for India in #cycling as Esow wins a bronze medal in the men’s Keirin at the World Jr. Track Cycling Championships in Frankfurt.🚴🏻♂️🇮🇳👏🏻🎉
👉🏻Esow is a #TOPSDevelopmentalAthlete.@KirenRijiju@RijijuOffice@IndiaSports@Asiancycling#KheloIndiapic.twitter.com/EoqUXDVUym
गेल्यावर्षी त्याचे सुवर्ण पदक फक्त 0.017 सेकंदाच्या फरकाने हुकले होते. त्यावेळी चेक गणराज्याचा याकुब स्टॅस्नी सुवर्ण विजेता ठरला होता. यावेळी एसो तिसऱ्या स्थानी राहिला. ग्रीसचा काँन्स्टॅन्टिनोस लिव्हानोस व ऑस्ट्रेलिया च्या सॅम गॅलाघेर यांनी क्रमाने त्याच्यापुढे बाजी मारली. याशिवाय भारतासाठी पहिले विश्व अजिंक्यपद सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाच्या यशातही त्याचे योगदान होते.
गेल्यावेळी अगदी थोडक्यात हुकलेल्या सुवर्ण पदकाबद्दल एसो म्हणतो की, मी सुवर्ण पदक जिंकू शकलो असतो पण रौप्यपदकानेही मी समाधानी आहे. विश्व अजिंक्यपद स्पर्धेत आपण पदक जिंकू शकतो याचाच त्याला आनंद होता.
विश्व अजिंक्यपद स्पर्धेशिवायही एसोने सायकलिंगच्या बऱ्याच स्पर्धा गाजविल्या आहेत. 2018 च्या कॉटबसर स्प्रिंट कप, जीपी ब्रनो ट्रॅक सायकलिंग स्पर्धेचा तो विजेता ठरला. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही त्याने यश मिळवले. 2018 च्या आशियाई ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत त्याने वैयक्तिक आणि सांघिक सुवर्ण पदक पटकावले. त्यानंतर ज्युनियर स्प्रिंटमध्येही तो पहिला आला होता.
एसो हा पोर्ट ब्लेयरच्या सरकारी मॉडेल स्कुलचा विद्यार्थी. तो शाळेत शिकत असतानाच त्याच्या आईने वर्तमानपत्रात नेताजी स्टेडियममधील राज्य क्रीडा परिषदेची ज्युनियर स्पोर्टस् ट्रेनीजना प्रवेश मिळणार असल्याची जाहिरात पाहिली आणि एसो अल्बेनचा पारंपरिक शिक्षणाकडून क्रीडा प्रशिक्षणाकडचा प्रवास सुरू झाला. आरंभी त्याची नौकानयन प्रशिक्षणासाठी निवड झाली पण बुटका असल्याने पुढे त्याला सायकलिंगकडे वळविण्यात आले.
2015 मध्ये केरळातील राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत 14 वर्षाआतील गटाच्या 500 मीटर टाईम ट्रायलचे रौप्यपदक जिंकून त्याचा यशाचा प्रवास सुरू झाला. लगेचच त्याची दिल्लीच्या राष्ट्रीय सायकलिंग अकादमीने निवड केली आणि एसो आणखी बारकावे शिकला.
खरं तर एसोच्या रक्तातच सायकलिंग आहे कारण त्याचे वडील अल्बान दिदूस हेसुध्दा सायकलपटू होते आणि पोलीस दलाचे त्यांनी विविध स्पर्धात प्रतिनिधित्व केले आहे. एसोची आई लेली यासुध्दा राष्ट्रीय स्तराच्या कबड्डीपटू आहेत.
काय आहे सायकलिंगचा किरीन स्पर्धाप्रकार?
एसो अल्बेन सायकलिंगच्या किरिन स्पर्धाप्रकारात देशाचे नाव उंचावतोय. पण नेमका काय आहे हा स्पर्धाप्रकार? तर सायकलिंगमध्ये स्प्रिंट व किरिन हे दोन प्रमुख प्रकार आहे.
किरीनमध्ये सायकलपटूंना एका स्वयंचलीत वाहनामागे (बहुतेकदा मोटारसायकल) नियंत्रित वेगाने सायकलिंग करावे लागते. म्हणजे स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत क्रमाक्रमाने वाढत्या वेगाने धावणारे मोटार सायकल किंवा तत्सम वाहन आणि त्याच्यामागे स्पर्धक सायकलपटू अशी ही स्पर्धा असते. जपानमध्ये या स्पर्धाप्रकाराची सुरुवात झाली. 2000 च्या सिडनी ऑलिम्पिकपासून त्याचा ऑलिम्पिकमध्येही समावेश करण्यात आला आहे.
त्यात आघाडीचे वाहन याला 'डर्नी' म्हणतात आणि साधारणपणे आठ लॅपची ही स्पर्धा असते. यात डर्नी सहाव्या लॅपपर्यंत क्रमाक्रमाने वेग वाढवत असतो आणि त्यानंतर तो स्पर्धकांच्या मार्गातून बाजूला होता. खरी स्पर्धा यानंतरच सुरू होते. या शेवटच्या 750 मीटर अंतरातच जो सर्वाधिक वेगाने सायकल पळवून सर्वप्रथम अंतिम रेषा पार करतो तो विजेता ठरतो.
किरिन साठीच्या सायकली या ब्रेक नसलेल्या फिक्स्ड गिअर सायकली असतात. शर्यत साधारणतः दीड किलोमीटर अंतराची असते. त्यात अडीचशे मीटरच्या ट्रॅकवर सहा लॅप किंवा 400 मीटरच्या ट्रॅकवर चार लॅप किंवा 333 मीटरच्या ट्रॅकवर चार लॅप होतात. 'डर्नी' च्या पाठीमागे सायकलपटूंचा क्रम ठरविण्यासाठी लॉटस् टाकण्यात येतात. पहिल्या तीन लॅपपर्यंत सायकलपटूंना डर्नीच्या मागेच नियंत्रित वेगाने सायकल पळवायची असते. कुणीही डर्नीच्या पुढे जाऊ शकत नाही.
स्पर्धेची सुरुवात 'डर्नी' 30 किलोमीटर प्रती तास या वेगाने करतो आणि हळूहळू हा वेग 50 किलोमीटर प्रती तासापर्यंत वाढवतो. स्पर्धा संपायला 750 मीटर असताना 'डर्नी' बाजूला होतो आणि खऱ्या अर्थाने स्पर्धा सुरु होते. त्यानंतर बहुतेकदा अंतिम रेषा पार करताना सायकलपटूंचा वेग 70 किलोमीटर प्रतीतासापर्यंत पोहचलेला असतो.