पुणे मॅरेथॉनमध्ये इथिओपियाच्या धावपटूंचे वर्चस्व, भारतीय गटात करणसिंग, संपदा बुचडे अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2017 12:07 PM2017-12-03T12:07:52+5:302017-12-03T12:39:02+5:30
३२व्या पुणे मॅरेथॉनमध्ये पुरूष आणि महिलांच्या मुख्य शर्यतीत इथिओपियाच्या धावपटूंनी रविवारी वर्चस्व गाजवले. भारतीय गटामध्ये पुरुष गटात करणसिंग आमी महिला गटात संपदा बुचडे या पुण्याच्या खेळाडूंनी बाजी मारली.
पुणे : ३२व्या पुणे मॅरेथॉनमध्ये पुरूष आणि महिलांच्या मुख्य शर्यतीत इथिओपियाच्या धावपटूंनी रविवारी वर्चस्व गाजवले. भारतीय गटामध्ये पुरुष गटात करणसिंग आणि महिला गटात संपदा बुचडे या पुण्याच्या खेळाडूंनी बाजी मारली.
पुरुषांच्या ४२ किलोमीटरच्या मुख्य शर्यतीत इथिओपियाच्या गेताचू बेशा याने २ तास १५.१५ मिनिटांच्या वेळेसह अव्वल स्थान पटकावले. झेलालेम लेमा डिलेमा (२.१५.९१), देवेजे कसाव (२.१७.२०) हे इथिओपियाचे खेळाडू अनुक्रमे दुसरे आणि तिसरे आले. या गटातील पहिले सहा खेळाडू आणि पहिल्या दहापैकी आठ खेळाडू इथिओपियाचे आहेत.
महिलांच्या गटात इथिओपियाची तिसासूआ बॅसाझीन विजेती ठरली. तिने १ तास २३.४० मिनिटे अशी वेळ दिली. इथिओपियाचीच आगेर बेलेव (१.२५.४०) दुसरी तर, केनियाची दसकॅलिया जेपकोगेल (१.३०.१५) तिसरी आली.
भारतीय पुरुषांच्या ४२ किलोमीटर शर्यतीत पुण्याच्या करणसिंग याने २ तास २८.०१ मिनिटांच्या वेळेसह पहिले स्थान पटकावले. किशोर गव्हाणे आणि दादासाहेब खिलारे हे पुणेकर खेळाडू अनुक्रमे दुसरे आणि तिसरे आले.
भारतीय महिलांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये पुण्याची संपदा बुचडे अव्वल ठरली. विनया मालुसरे आणि निकिता गोयल या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान प्राप्त केले.