Euro Cup 2024 Final: इंग्लंडचा पुन्हा स्वप्नभंग! 'टिकीटाका' नितीचा बादशहा स्पेननं UEFA EURO कपवर नाव कोरलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 06:43 AM2024-07-15T06:43:19+5:302024-07-15T06:53:15+5:30
Euro Cup 2024 Final : स्पेनच्या संघाने युरो कपमध्ये इतिहास घडवला आहे. अंतिम फेरीत इंग्लंड संघाविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
स्पेनच्या संघाने युरो कपमध्ये इतिहास घडवला आहे. अंतिम फेरीत इंग्लंड संघाविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला. या स्पर्धेच्या इतिहासात चारवेळा अशी कामगिरी करणारा स्पेन हा पहिला संघ ठरला आहे. इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या अंतिम सामन्यात संघाने २-१ असा विजय मिळवत नवा विक्रम रचला. १२ वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवून संघाने युरो चॅम्पियनशिप जिंकली.
स्पेन आणि इंग्लंड यांच्यातील युरो कप २०२४ च्या फायनलची जोरदार चर्चा होती. सामना सुरू झाला तेव्हा दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करण्याऐवजी संथपणे सुरुवात केली. पूर्वार्धात कोणत्याही संघाला गोल करण्याची संधी मिळाली नाही. उत्तरार्धात उत्साह वाढला आणि स्पॅनिश संघाने आघाडी घेतली. निको विल्यम्सने खेळाच्या ४७व्या मिनिटाला इंग्लंडविरुद्ध गोल केला.
पहिला गोलनंतर इंग्लंडने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. ७३व्या मिनिटाला पामरने स्पेनच्या गोलपोस्टमध्ये चेंडू टाकत संघाला बरोबरी साधून दिली. १-१ अशा बरोबरीनंतर सामन्याची उत्कंठा आणखी वाढली. दोन्ही बाजूंनी आघाडी घेण्याचा प्रयत्न केला पण सामना संपण्यापूर्वी स्पेनने दुसरा गोल करत युरो चॅम्पियनशिप जिंकली. ओयारझाबलने विजयी गोल केला. ८६व्या मिनिटाला केलेला हा गोल सामन्यासाठी निर्णायक ठरला.
स्पेनच्या संघाने शेवटचे हे विजेतेपद २०१२ मध्ये जिंकले होते. तब्बल १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा संघाने विजय मिळवला आहे. २०२० च्या फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न घेऊन इंग्लंडचा संघ येथे आला होता, पण स्पेनने त्यांना हरवून चाहत्यांच्या आशा धुळीस मिळवल्या. स्पॅनिश संघाने १९६४, २००८ आणि २०१२ मध्ये हे विजेतेपद पटकावले होते आणि आता इंग्लंडला पराभूत करून २०२४ युरोपियन चॅम्पियनशिप जिंकली आहे. चारवेळा युरो कप जिंकणारा स्पेन हा पहिला संघ ठरला आहे. जर्मनीने तीनवेळा हे विजेतेपद पटकावले आहे, तर इंग्लंडच्या संघाला ६६ वर्षांच्या इतिहासात एकदाही हे विजेतेपद मिळवता आलेले नाही.
🇪🇸 Spain are champions of Europe 🏆#EURO2024pic.twitter.com/Ch0AF0iPWl
— UEFA EURO 2024 (@EURO2024) July 14, 2024