युरो कप : क्लेटेनबर्ग असणार 'फायनल' रेफ्री
By admin | Published: July 8, 2016 06:37 PM2016-07-08T18:37:59+5:302016-07-08T18:37:59+5:30
रविवारी होणाऱ्या पोर्तुगाल वि. फ्रान्स या हायव्होल्टेज युरो कप अंतिम सामन्यासाठी इंग्लंडचे मार्क क्लेटेनबर्ग यांची रेफरी म्हणून निव्ड झाली आहे.
ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. ८ : रविवारी होणाऱ्या पोर्तुगाल वि. फ्रान्स या हायव्होल्टेज युरो कप अंतिम सामन्यासाठी इंग्लंडचे मार्क क्लेटेनबर्ग यांची रेफरी म्हणून निव्ड झाली आहे. युरोपीयन फुटबॉल संघटनेने (यूईएफए) याबाबत अधिकृत माहिती दिली.
४१ वर्षीय क्लेटेनबर्ग यांनी मे महिन्यात झालेल्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही रेफ्रीची भूमिका बजावली होती. यावेळी रेयाल माद्रिदने एटलेटिको संघाला नमवताना जेतेपदावर कब्जा केला होता. विशेष म्हणजे त्यावेळी रेयाल माद्रिद संघातून ख्रिस्तियानो रोनाल्डोने चमकदार खेळ केला होता. त्यामुळे, क्लेटेनबर्ग रेफ्री असताना पुन्हा एकदा रोनाल्डो अंतिम फेरीसाठी सज्ज असून यावेळी तो आपला देश पोर्तुगालला विजयी करण्यात यशस्वी ठरतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
क्लेटेनबर्ग यासह युरोपमधील दोन प्रमुख स्पर्धेच्या अंतिम सामन्याची जबाबदारी सांभळणारे दुसरे रेफ्री ठरले आहेत. याआधी अशी कामगिरी पोर्तुगालच्या पेड्रो प्रोएन्का यांनी केली होती. त्याचप्रमाणे रविवारी होणारा अंतिम सामना क्लेटेनबर्ग यांचा युरो कपमधील चौथा सामना असेल, ज्यात ते रेफ्री म्हणून जबाबदारी पार पाडतील. याआधी ते बेल्जियम - इटली, झेक प्रजासत्ताक - क्रोएशिया आणि स्वित्झर्लंड - पोलंड या सामन्यात रेफ्री होते.