Euro Cup football : इंग्लंड पहिल्यांदाच अंतिम फेरीत, जेतेपदासाठी इटलीविरुद्ध रविवारी लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 09:21 AM2021-07-09T09:21:33+5:302021-07-09T09:22:09+5:30
डेन्मार्कने जबरदस्त सुरुवात करताना इंग्लंडवर कमालीचे दडपण ठेवले. इंग्लंडचा हुकमी खेळाडू कर्णधार हॅरी केन याला घेरताना डेन्मार्कने त्याला फारशी संधीच दिली नाही. त्यातच, मिकेल डॅम्सगार्ड याने ३० व्या मिनिटाला गोल करत डेन्मार्कला १-० आघाडी मिळवून दिली.
लंडन : एका गोलने पिछाडीवर पडल्यानंतर अतिरिक्त वेळेत निर्णायक गोल करत इंग्लंडने डेन्मार्कचे कडवे आव्हान २-१ असे परतवले. या रोमांचक विजयासह इंग्लंडने युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे १९६६ सालच्या विश्वविजेतेपदानंतर इंग्लंडने पहिल्यांदाच एखाद्या मोठ्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. जेतेपदासाठी इंग्लंडला आता तगड्या इटलीविरुद्ध खेळावे लागेल. जमेची बाजू म्हणजे घरच्या मैदानावर रविवारी अंतिम सामना होणार असल्याने इंग्लंडला प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा मिळेल.
डेन्मार्कने जबरदस्त सुरुवात करताना इंग्लंडवर कमालीचे दडपण ठेवले. इंग्लंडचा हुकमी खेळाडू कर्णधार हॅरी केन याला घेरताना डेन्मार्कने त्याला फारशी संधीच दिली नाही. त्यातच, मिकेल डॅम्सगार्ड याने ३० व्या मिनिटाला गोल करत डेन्मार्कला १-० आघाडी मिळवून दिली.
मात्र, त्यांचा हा आनंद फार वेळ टिकला नाही. ३९ व्या मिनिटाला सिमॉन जाएरकडून झालेल्या स्वयंगोलामुळे इंग्लंडला बरोबरीची आयती संधी मिळाली. हाच स्वयंगोल डेन्मार्कसाठी निर्णायक ठरला. यानंतर दोन्ही संघांनी भक्कम बचाव करत निर्धारित वेळेपर्यंत बरोबरी कायम राखली. केनने रचलेल्या अनेक आक्रमक चालींमुळे डेन्मार्कच्या खेळाडूंमध्ये तणाव निर्माण झाला. शिवाय यानसेन याला दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावे लागल्याने डेन्मार्कला दहा खेळाडूंसह खेळावे लागले. १०४ व्या मिनिटाला इंग्लंडला पेनल्टी मिळाली. कर्णधार केनने मारलेली किक डेन्मार्कच्या गोलरक्षकाने अडवली, मात्र चेंडू हातून सुटला आणि ही संधी साधत केनने रिबाऊंड किकवर गोल साकारत इंग्लंडचा विजय निश्चित केला.
५५ वर्षानंतर इंग्लंडला संधी
इंग्लंडने फुटबॉलचा विश्वचषक १९६६ ला जिंकला होता. आता युरो षटकाच्या रूपाने ५५ वर्षानंतर पुन्हा एकदा जल्लोष करण्याची संधी असेल. मात्र त्यासाठी त्यांना मागील ३३ सामन्यात अपराजित असलेल्या इटलीचे कडवे आव्हान मोडून काढावे लागणार आहे. मागच्या ५५ वर्षांत इंग्लंडने विश्वचषक आणि युरो अशा २६ स्पर्धा पाहिल्या. सातवेळा तर हा संघ पात्र देखील ठरला नव्हता. डेन्मार्क आणि ग्रीससारख्या लहान देशांनी जेतेपदावर नाव कोरले, मात्र इंग्लंडचे नशीब फळफळले नव्हते. यंदा मात्र मोठी संधी हातातोंडाशी आली आहे.
वादग्रस्त पेनल्टीमुळे डेन्मार्क नाराज
- डेन्मार्कचे कोच कास्पर जुल्मंड यांनी अखेरच्या क्षणी इंग्लंडला बहाल करण्यात आलेल्या पेनल्टीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. रिव्ह्यू मागितल्यानंतरही हा निर्णय कायम होता.
- यावर कास्पर म्हणाले, ‘ती पेनल्टी नव्हतीच! मी या निर्णयावर समाधानी नाही.’ इंग्लंडचे कोच जेरेथ साऊथगेट यांनी , ‘ तपासणीअंती देण्यात आलेला निर्णय सर्वमान्य होता,’ अशी प्रतिक्रिया दिली.
डेन्मार्कच्या गोलकीपरवर लेझर लाईट मारल्याने संताप
- १०४ व्या मिनिटाला हॅरी केन याने पेनल्टीवर मारलेला गोल इंग्लंडसाठी निर्णायक ठरला. हॅरीने गोल मारण्याआधी डेन्मार्कचा गोलकिपर कॅस्पर श्मायकल गोल अडविण्यासाठी सज्ज होता.
- प्रेक्षकांमधून कुणीतरी त्याच्या चेहऱ्यावर हिरव्या रंगाचा लेझर लाईट मारला. इंग्लंडच्या चाहत्यांनी असे केले असावे, असा अंदाज बांधला जात आहे.