युरो चषक - फ्रान्स अंतिम फेरीत

By admin | Published: July 8, 2016 02:18 AM2016-07-08T02:18:57+5:302016-07-08T02:30:24+5:30

युरो चषक २0१६ फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ग्रिजमनने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर फ्रान्सने जगज्जेत्या जर्मनीला २-0 गोलने हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला.

Euro Cup - France final | युरो चषक - फ्रान्स अंतिम फेरीत

युरो चषक - फ्रान्स अंतिम फेरीत

Next

मार्सेले : युरो चषक २0१६ फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ग्रिजमनने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर फ्रान्सने जगज्जेत्या जर्मनीला २-0 गोलने हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. २000 नंतर पहिल्यांदाच फ्रान्स युरो चषकाच्या अंतिम फेरीत पोहचला आहे. 
सुरवातीची दहा मिनिटे यजमान फ्रान्सने दबदबा निर्माण केला, परंतु त्यानंतर रंगात आलेल्या जर्मनीने फ्रान्सच्या गोलपोस्टवर धडाधड आक्रमणे केली. चेंडू सतत फ्रान्सच्या गोलक्षेत्रात फिरत होता. सामन्यात चेंडूचे पझेशन जर्मनीकडे ६५ टक्के तर फ्रान्सकडे ३५ टक्के इतके होते. 
सामन्यात वर्चस्व जर्मनीचे असले तरी पुर्वार्ध संपता संपता फ्रान्सचे नशीब फळफळले. ग्रिजमनच्या कॉर्नरला हेडद्वारे ब्लॉक करताना जर्मनीचा कर्णधार श्वाईनटायगरचा हात चेंडूला लागला आणि पंचांनी फ्रान्सला पेनाल्टी बहाल केली. 
ग्रिजमनने या पेनाल्टीचे सोने केले. त्याने चेंडूला उजव्या कोपऱ्यातून गोलजाळीत धाडून फ्रान्सला १-0 असे आघाडीवर नेले. 
उत्तरार्धात खेळ संथ होत आहे असे वाटत असतानाच पोग्बाच्या ग्रिजमनने ७२ व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवला. मैदानाच्या डाव्या कोपऱ्यात पोग्बाने पदलालित्याचा उत्कृष्ट नमुना दाखवत जर्मन खेळाडूला झुलवत गोलपोस्टच्या दिशेन फटका खेळला. हा चेंडू जर्मन गोलकिपर नेयुरने मोठ्या शिताफीने परतवला खरा, पण पुढे उभ्या असलेल्या ग्रिजमनने सहजपणे त्याला गोलजाळीची दिशा दाखवली. २-0 अशी आघाडी मिळाल्यामुळे स्टेडीयममध्ये उपस्थित यजमान संघाच्या चाहत्यांमध्ये उत्साह पसरला तर खेळाडूंमध्ये चैतन्य संचारले. 
पिछाडीवर पडलेल्या जर्मन संघाने यानंतर आक्रमणाचा जोर वाढवला. मुलर, ओझील, गोत्झे यांनी अनेक चढाया केल्या, परंतु त्यांना गोल नोंदवण्यात अपयश आले. फ्रान्सचा गोलरक्षक हुगो लोरिसने चपळाईने ही आक्रमणे परतावून लावली. शेवटी ही लढत २-0 अशी जिंकून फ्रान्सने अंतिम फेरी गाठली. (वृत्तसंस्था)

- या सामन्यापूर्वी जर्मनी आणि फ्रान्स यांच्यातील शेवटच्या पाच सामन्यापैकी एकाही सामन्यात फ्रान्सला विजय मिळालेला नाही.
- या सामन्यात दोन गोल नोंदवणाऱ्या ग्रिजमनने स्पर्धेत एकूण सहा गोल नोंदवले आहेत.

Web Title: Euro Cup - France final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.