प्रत्येक दिवस नवी आव्हाने घेऊन येतो
By admin | Published: January 14, 2017 01:11 AM2017-01-14T01:11:51+5:302017-01-14T01:11:51+5:30
ब्राझीलचा स्टार डिफेंडर असलेल्या डेव्हीड लुईस याने अनेक मोठ्या फुटबॉल जेतेपद पटकाविली आहेत. मात्र, प्रीमियर लीगच्या जेतेपदाने
ब्राझीलचा स्टार डिफेंडर असलेल्या डेव्हीड लुईस याने अनेक मोठ्या फुटबॉल जेतेपद पटकाविली आहेत. मात्र, प्रीमियर लीगच्या जेतेपदाने अद्याप त्याला हुलकावणीच दिली आहे. त्यामुळेच यंदाच्या मोसमात चेल्सीकडून त्याच्या खूप अपेक्षा आहेत. यंदा चेल्सीने सलग १३ विजयांची माळ गुंफताना सर्वांचे लक्ष वेधले. गेल्याच आठवड्यात टॉट्टनहॅम येथे त्यांची घोडदौड थांबल्यानंतर आता चेल्सी पुन्हा एकदा विजयी मार्गावर येण्यास उत्सुक असून, त्यांच्यापुढे आव्हान आहे ते लिसेस्टर सिटीचे. यानिमित्ताने लुईसशी केलेली बातचीत....
स्पर्स येथे झालेल्या पराभवानंतर विजयी मालिका खंडित झाल्याने काही चेल्सी चाहते नाराज झालेत. त्यांच्यासाठी काय संदेश देशील?
- चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. आता केवळ जानेवारी महिनाच सुरू आहे. प्रीमियर लीगमध्ये गुणतालिकेत मे महिन्यापर्यंत अव्वल राहणे हेच महत्त्वाचे असते. मी कोणालाही ही स्पर्धा फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये जिंकल्याचे पाहिले नाही. आम्ही चांगला खेळ करीत असून, आमचा आत्मविश्वास मजबूत आहे.
पुन्हा विजयी मार्गावर येण्यासाठी काय आवश्यक आहे?
- नवीन काहीच नाही. आम्ही गुणतालिकेत अग्रस्थानी आहोत. सर्वत्र महत्त्वाचे म्हणजे हे अव्वल स्थान आम्हाला कायम ठेवायचे आहे. प्रीमियर लीगमध्ये प्रत्येक सामना वेगळा आणि आव्हानात्मक असतो. जिंकणे कधीच सोपे नसते.
टॉट्टनहॅम संघाला कडवा प्रतिस्पर्धी मानतोस का?
- नक्कीच. मोसमाच्या सुरुवातीपासूनच जेतेपदासाठी कडवे प्रतिस्पर्धी म्हणून त्यांचे आव्हान होते. त्यांच्याकडे मौरिसिओ पोशेट्टीनो असून, ते शानदार प्रशिक्षक आहेत. आता तर, जेतेपदाच्या शर्यतीची सुरुवात झाली असल्याने प्रत्येक संघ सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करेल.
यंदा संघात मोठा अनुभव असल्याचे वाटते का?
- हो. विजेतेपद जिंकण्याचा असल्याचा अनुभव असल्याने चेल्सी चांगली कामगिरी करीत आहे. परंतु, प्रत्येक दिवस नवीन आव्हाने घेऊन येतो. त्यामुळे प्रत्येक आव्हानासाठी सज्ज रहावे लागेल. (पीएमजी/ईएसपी)