अब्जाधीश उद्योजकानं उघडला खजिना; भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेत्यांना लग्झरी कार गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 04:49 PM2024-08-02T16:49:04+5:302024-08-02T16:51:57+5:30

ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत भारतानं ३ पदके पटकावली आहे. भारतासाठी पदक जिंकणाऱ्या खेळाडूंवर देशातील विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

Every Olympic medalist from Team India will be gifted an MG Windsor - Sajjan Jindal | अब्जाधीश उद्योजकानं उघडला खजिना; भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेत्यांना लग्झरी कार गिफ्ट

अब्जाधीश उद्योजकानं उघडला खजिना; भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेत्यांना लग्झरी कार गिफ्ट

नवी दिल्ली - भारतातील प्रतिष्ठीत अब्जाधीश उद्योगपती सज्जन जिंदल यांनी पॅरिस ऑलिम्पिकबाबत मोठी घोषणा केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या प्रत्येक भारतीय खेळाडूला ते एक MG विंडसर कार गिफ्ट म्हणून देणार आहेत. आपले सर्वोत्कृष्ट खेळाडू त्यांच्या समर्पण आणि यशासाठी सर्वोत्तम पात्र आहेत याचा आनंद आहे असं ट्विट करत जेएसडब्ल्यू ग्रुपचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर यांनी खेळाडूंचं अभिनंदन केले आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत भारताच्या खात्यात ३ पदके आली आहेत. २२ वर्षीय मनु भाकरने १० मीटर एअर पिस्तुलमध्ये कांस्य पदक मिळवून भारताच्या विजयाचं दार उघडलं. त्यानंतर १० मीटर एअर पिस्तुल मिक्स्ड टीममध्ये सरबजोत सिंगसोबत मिळून आणखी एक कांस्य पदक भारतासाठी पटकावलं. त्यानंतर महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे याने तिसरं पदक मिळवले. ५० मीटर रायफल थ्री पोजीशनमध्ये त्याला कांस्य पदक मिळालं. त्यामुळे आतापर्यंत या तिघांना लग्झरी कार भेट म्हणून मिळणं निश्चित झालं आहे.

विशेष बाब म्हणजे जिंदल यांची ही पोस्ट मॉरिस गॅरेज इंडियाकडून जेएसडब्ल्यू ग्रुपच्या मदतीनं मार्केटमध्ये येणारी नवीन सीयूवी एमजी विंडसरच्या घोषणेनंतर आली. या कारचे डिझाइन विंडसर कॅसल जे इंग्लंडच्या बर्कशायर काऊंटी इथल्या विंडसरमधील शाही किल्ल्यापासून प्रेरित आहे असं एमजीने सांगितले. एमजी विंडसर हे उत्कृष्ट कारागिरी, उत्कृष्टता आणि रॉयल्टीचे प्रतीक मानले जाते. एमजी विंडसर या वाहनाची रचना उत्कृष्ट असून ती बनवताना अत्यंत काळजी घेण्यात आली आहे असं यूकेस्थित कंपनीने असा दावा केला. 

MG Windsor कार किती खास?

MG Motor India ने अलीकडेच त्यांच्या आगामी सर्व-इलेक्ट्रिक क्रॉसओवर विंडसर EV असेल अशी माहिती दिली आहे. ZS EV आणि Comet EV नंतर हे कंपनीचे देशातील तिसरे इलेक्ट्रिक वाहन असेल. परदेशी बाजारात सध्या असलेल्या या इलेक्ट्रिक कारचा लुक आणि स्टाइल जबरदस्त आहे. यात एलईडी डीआरएल, लो-स्लंग हेडलॅम्प, १८-इंच अलॉय व्हील, फ्लश डोअर हँडल आणि कनेक्टेड एलईडी टेललाइट्स आहेत. या कारमध्ये १५.६-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, ८.८-इंच डिजिटल ड्रायव्हर्स डिस्प्ले, ६-वे पॉवर ड्रायव्हर सीट सारखी वैशिष्ट्ये आहेत. जागतिक स्तरावर ती क्लाउड ईव्ही नावाने विकली जाते. रिपोर्टनुसार सप्टेंबर २०२४ मध्ये येणाऱ्या या कारची किंमत जवळपास १५-२० लाख रुपये एक्स शोरुम असू शकते. 

Web Title: Every Olympic medalist from Team India will be gifted an MG Windsor - Sajjan Jindal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.