प्रत्येक राज्याने एका खेळाचा विकास करावा-क्रीडामंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 02:37 AM2020-07-09T02:37:38+5:302020-07-09T02:38:12+5:30
म्ही प्रत्येक राज्याला एक खेळ निवडण्यास सांगितले आहे. उदाहरणादाखल सांगायचे तर मणिपूरने बॉक्सिंग, सेपक टॅकरॉ, फुटबॉल किंवा तिरंदाजीची निवड केल्यास त्या खेळावर पूर्ण लक्ष द्यावे लागेल.
नवी दिल्ली: आॅलिम्पिकमध्ये अधिक पदके जिंकण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या मोहिमेंतर्गत प्रत्येक राज्याने कुठल्याही एका खेळाची निवड करून त्या खेळाच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे, अशी सूचना क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी केली.
अॅसोचेमतर्फे आयोजित करण्यात आलेल्या फिट इंडिया के लिए कॉर्पोरेट भारत की भूमिका’ या विषयावरील वेबिनारमध्ये बोलताना क्रीडामंत्र्यांनी कार्पोरेट क्षेत्राला देखील अशीच भूमिका वठविण्याचे आवाहन केले. ते म्हणाले,‘आम्ही प्रत्येक राज्याला एक खेळ निवडण्यास सांगितले आहे. उदाहरणादाखल सांगायचे तर मणिपूरने बॉक्सिंग, सेपक टॅकरॉ, फुटबॉल किंवा तिरंदाजीची निवड केल्यास त्या खेळावर पूर्ण लक्ष द्यावे लागेल.याशिवाय काही धोरणात्मक बदल केले असून याअंतर्गत प्रत्येक कॉर्पोरेटने एखादी स्पर्धा दत्तक घेत त्यावर पूर्ण लक्ष देण्याची योजना आहे. तथापि यामुळे अन्य खेळांना मदत पुरविण्यापासून तुम्हाला रोखण्यात येणार नाही. भारतासारख्या मोठ्या देशात अनेक स्पर्धांवर लक्ष देण्याची गरज आहे. सर्व राज्यांनी एकेक खेळाचा अंगिकार केल्यास क्रीडा क्षेत्राला मोठी उभारी मिळू शकेल.
‘आमच्याकडे ३६ राज्ये आहेत. सर्व राज्यांनी ३६ खेळांवर लक्ष केद्रित केल्यास अपेक्षित निकाल मिळू शकतील,’ अशी अपेक्षा करीत भारत २०२८ च्या लॉस एंजिलिस आॅलिम्पिकमध्ये पदक तालिकेत पहिल्या दहा देशात राहील,या अपेक्षेचा रिजिजू यांनी पुनरुच्चार केला.(वृत्तसंस्था)