विजेत्याबाबत सगळ्यांनाच उत्कंठता, वाढीव संघ पहिल्यांदाच सहभागी होणार
By प्रज्ञा म्हात्रे | Published: November 30, 2023 04:15 PM2023-11-30T16:15:16+5:302023-11-30T16:15:34+5:30
प्रशांत जाधवर फाउंडेशन आणि विठ्ठल क्रीडा मंडळ आयोजित या स्पर्धेत राज्य संघटनेच्या नवीन धोरणामुळे वाढीव संघ पहिल्यांदाच सहभागी होणार आहेत.
ठाणे : महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या नवीन धोरणानुसार होत असलेल्या कुमार, कुमारी गटाच्या सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेचा बिगुल शुक्रवारी ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे क्रीडा नगरीत वाजेल. प्रशांत जाधवर फाउंडेशन आणि विठ्ठल क्रीडा मंडळ आयोजित या स्पर्धेत राज्य संघटनेच्या नवीन धोरणामुळे वाढीव संघ पहिल्यांदाच सहभागी होणार आहेत.
या नव्या संघांमुळे स्पर्धेची सर्वच समीकरणे बदलेली असल्यामुळे नवे विजेते कोण ठरणार याची उत्कंठता सगळ्यांनाच लागली आहे. राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत यंदा २५ जिल्ह्यांच्या संघासह अ आणि ब दर्जाच्या महापालीकेंचे संघ स्पर्धेत आपला दम दाखवणार आहेत. या नवीन संघामध्ये गतविजेत्या मुंबई उपनगर जिल्ह्याचे पूर्व आणि पश्चिम से दोन संघ आहेत.हीच परिस्थिती मुंबई शहर, ठाणे, पुणे आणि नाशिक जिल्ह्याबाबत असल्यामुळे संघांमध्ये अनेक बदल झालेले आहेत. त्यामुळे संघाच्या एकूण ताकदीबाबत अंदाज नसल्याने कुठला संघ सरस ठरेल हे प्रत्यक्षात मैदानावरच कळणार आहे.
स्पर्धेतील संघाची सहा ऐवजी आठ गटात विभागणी करण्यात आली आहे. सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविले जातील. गतवर्षी मिळालेल्या मानांकना प्रमाणे स्पर्धेची गटवारी तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आली असून नव्याने सहा संघांच्या प्रवेशामुळे यात फरक पडण्याची शक्यता आहे. यंदाच्या स्पर्धेत मिळालेल्या मानांकानुसार पुढील वर्षापासून पुन्हा गटवारी जाहीर करण्यात येईल. असे राज्य संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे यांनी सांगितले.
या स्पर्धेच्या निमित्ताने धर्मवीर आनंद दिघे क्रीडा नगरीतील लक्ष्मण गांगल क्रीडांगण, विक्रम पाथरे क्रीडांगण, रमेश गांवकर क्रीडांगण,संजय म्हस्के क्रीडांगण, सुधीर राऊळ क्रीडांगण, बाळकृष्ण जाधव क्रीडांगण या विठल क्रीडा मंडळाच्या दिवंगत कबड्डीपटूंच्या नावे तयार करण्यात आलेल्या मैदानावर खेळवण्यात येतील असे आयोजन समितीचे प्रमुख मार्गदर्शक आणि ठाणे महापालीकेचे माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी सांगितले.
गटवारी खालील प्रमाणे...
कुमार गट:- १) अ गट:- १)मुंबई उपनगर पूर्व, २)पुणे शहर, ३)औरंगाबाद.
२) ब गट:- १)अहमदनगर, २)पालघर, ३)जालना, ४)सोलापूर.
३) क गट:- १)पुणे ग्रामीण, २)जळगाव, ३)धुळे, ४)लातूर.
४) ड गट:- १)ठाणे ग्रामीण, २)परभणी, ३)नाशिक शहर, ४)हिंगोली.
५) इ गट:- १)कोल्हापूर, २)बीड, ३)मुंबई शहर पूर्व, ४)मुंबई उपनगर पश्र्चिम.
६) फ गट:- १)पिंपरी-चिंचवड, २)सातारा, ३)सिंधुदुर्ग, ४)नांदेड.
७) ग गट:- १)सांगली, २)रायगड, ३)मुंबई शहर पश्र्चिम, ४)नाशिक ग्रामीण.
८) ह गट:- १)रत्नागिरी, २)नंदुरबार, ३)उस्मानाबाद, ४)ठाणे शहर.
कुमारी गट:- १) अ गट:- १)मुंबई उपनगर पूर्व, २)रायगड, ३)औरंगाबाद.
२) ब गट:- १)पुणे ग्रामीण, २)सातारा, ३)धुळे, ४)जालना.
३) क गट:- १)परभणी, २)नाशिक ग्रामीण, ३)हिंगोली, ४)सिंधुदुर्ग.
४) ड गट:- १)मुंबई शहर पश्र्चिम, २)कोल्हापूर, ३)पालघर, ४)ठाणे शहर.
५) इ गट:- १)सांगली, २)नांदेड, ३)मुंबई शहर पूर्व, ४)जळगाव.
६) फ गट:- १)सोलापूर, २)बीड, ३)लातूर, ४)अहमदनगर.
७) ग गट:- १)रत्नागिरी, २)नाशिक शहर, ३)नंदुरबार, ४)पिंपरी-चिंचवड.
८) ह गट:- १)ठाणे ग्रामीण, २)पुणे शहर, ३)मुंबई उपनगर पश्र्चिम, ४)उस्मानाबाद.