खेळामध्ये सर्वांना समान संधी मिळणे आवश्यक
By admin | Published: May 6, 2016 05:05 AM2016-05-06T05:05:15+5:302016-05-06T05:05:15+5:30
भारताला क्रीडाक्षेत्रात प्रगती करायची असेल, तर खेळाचे लोकशाहीकरण व्हायला हवे. संधी आणि सुविधांचे समान व्यासपीठ सर्वांना उपलब्ध व्हायला हवे. त्यासाठी प्रचंड प्रयत्नांची गरज आहे
पुणे : भारताला क्रीडाक्षेत्रात प्रगती करायची असेल, तर खेळाचे लोकशाहीकरण व्हायला हवे. संधी आणि सुविधांचे समान व्यासपीठ सर्वांना उपलब्ध व्हायला हवे. त्यासाठी प्रचंड प्रयत्नांची गरज आहे, असे व्यक्तव्य आॅलिम्पिक कांस्यपदक विजेता नेमबाज गगन नारंग याने केले.
कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित पुणे आंतरराष्ट्रीय स्पोटर््स एक्स्पोच्या (पीआयएसई) उद््घाटन समारंभात अध्यक्षीय भाषणात गगनने क्रीडाक्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजनाबाबत विचार मांडले. या वेळी भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज व आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याचीही विशेष उपस्थिती होती. यावेळी रोहितने फीत कापून औपचारिक उद््घाटन केले.
गगन पुढे म्हणाला, ‘‘माझ्या देशासाठी पदक जिंकणे माझे कर्तव्य आहे. आॅलिम्पिक स्पर्धेत पुन्हा एकदा पदक जिंकण्याचे माझे स्वप्न मी पूर्ण करण्याचे प्रयत्न करणार आहे.’’
काही दिवसांपूर्वी केंद्रिय क्रीडामंत्र्यांनी रियो आॅलिम्पिक स्पर्धेत आपण १० पदके जिंकू, अशी अपेक्षा दर्शविली आहे. याबाबत गगन म्हणाला, की ‘‘हे लक्ष्य साध्य करणे संभव आहे की नाही, यापेक्षा त्यासाठी केले जाणारे प्रयत्न व घेण्यात येणारे कष्ट हे महत्त्वाचे.
नक्कीच जर सरकार यावर एवढा खर्च करीत असेल, तर त्यांनी
एवढी अपेक्षा करणे काहीच गैर नाही; पण हे संभव आहे का? हे लक्ष्य साध्य हाऊ शकते; पण कधी?
जेव्हा भारतातील क्रीडाक्षेत्राचे लोकशाहीकरण होईल तेव्हा.
जेव्हा संधी आणि सुविधांचे समान व्यासपीठ सर्वांना उपलब्ध होईल आणि जेव्हा भारतीय क्रीडाक्षेत्रात अधिक खेळाडू सहभागी होतील तेव्हाचे हे साध्य होईल. केवळ एलिट खेळाडूंवर लक्ष केंद्रित करुन चालणार नाही.
भविष्यातील पदक विजेते खेळाडू घडविण्यासाठी निधी व वेळ खर्च करावा लागेल आणि मुख्य म्हणजे संयम ठेवावा लागेल.’’
माझ्या कारकिर्दीत पुण्याचे एक वेगळे स्थान आहे. मी पुण्यात १४ व १७ वर्षांखालील क्रिकेट खेळलो आहे. महत्त्वाचे म्हणजे १७ वर्षांखालील भारतीय संघात माझी निवड पुण्यातंच झाली होती. एक खेळाडू म्हणून चांगली, उत्कृष्ट कामगिरी करणे सोपे नसते. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि आम्ही तेच करीत असतो. मी क्रिकेटबाबत म्हणालो, कारण मी क्रिकेटर आहे. मी असे अनेक खेळाडू पाहतो, की ज्यांचे आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न असते. त्यासाठी त्यांना आणि रियो आॅलिम्पिक स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला खूप शुभेच्छा. - रोहित शर्मा