मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत आनंदची परीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 03:07 AM2020-01-11T03:07:36+5:302020-01-11T03:07:46+5:30
पाच वेळचा जग्गजेता विश्वनाथन आनंद शनिवारी येथे सुरु होणाऱ्या मास्टर्स सुपर बुद्धिबळ स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे.
विज्क ऑन जी (नेदरलॅँड) : पाचवेळचा जग्गजेता विश्वनाथन आनंद शनिवारी येथे सुरु होणाऱ्या मास्टर्स सुपर बुद्धिबळ स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. आनंदने या स्पर्धेत १८ वेळा सहभाग घेतला असून पाच वेळा विजेतेपद मिळवले आहे. २००६ मध्ये त्याने जेतेपद मिळवले होते. यावर्षीही तो जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.
या स्पर्धेत नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल. त्याने मागील वर्षी जबरदस्त कामगिरी करत तिन्ही प्रकरात जेतेपद पटकावले होते. रॅपिड, ब्लिट्झ व क्लासिकल प्रकारात त्याने बाजी मारली होती.
कर्लसनचे सध्या २८७२ गुण असून या स्पर्धेदरम्यान २९००चा आकडा पार करण्याचे त्याचे ध्येय असेल. कार्लसन अग्रमानांकित म्हणून स्पर्धेत सहभागी होईल, तर अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाला दुसरे, अनिश गिरीला तिसरे मानांकन आहे. विश्वनाथन आनंदला पाचवे मानांकन आहे. (वृत्तसंस्था)