उत्कंठा शिगेला पोहोचतेय!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 06:04 AM2020-01-05T06:04:39+5:302020-01-05T06:04:48+5:30
महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील सर्वांत मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते.
- दिनेश गुंड
महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील सर्वांत मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते. ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा मिळविण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक मल्ल वर्षभर तपश्चर्या करत असतात. प्रत्येक वजनगटातील मल्ल पदकासाठी या कुस्तीच्या कुंभमेळ्यात आपले सर्वस्व पणाला लावत असतात.
दोन दिवसांपासून सुरू झालेल्या या स्पर्धेची उत्सुकता शनिवारी मात्र शिगेला पोहोचली. याला निमित्त ठरले ते ‘महाराष्ट्र केसरी’ गटाच्या उत्कंठावर्धक लढती. गादी विभागात पहिल्या फेरीत महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार मानला जाणारा अभिजित कटकेने अमरावतीच्या मिरजा बेगला अवघ्या दहा सेकंदांत चितपट करून आपला इरादा स्पष्ट केला. गतवर्षी अंतिम लढतीतील चुका दूर करून अभिजितने यंदा जोरदार तयारी करीत दमदार कामगिरीचे संकेत दिले आहेत. सलामीची लढत आरामात जिंकून त्याने मुसंडी मारली.
प्रचंड ताकद, न थांबता लढण्याची वृत्ती हे वैशिष्ट्य असणारा मल्ल सागर बिराजदार यानेदेखील विक्रम वडतिले याला १०-० ने लोळवून प्रतिस्पर्धी मल्लांना आपली दखल घ्यायला भाग पाडले आहे. माती विभागातून बाला रफिक शेख याचे प्रमुख आव्हान आहे. गतवर्षी त्याने ‘महाराष्ट्र केसरी’ची मानाची गदा पटकावली होती. दुसऱ्यांदा किताब जिंकण्याच्या इराद्याने तो यंदा आखाड्यात उतरला आहे. त्या ईर्ष्येने झपाटलेल्या बाला रफीकने पहिली लढत जिंकली. नवोदित सिकंदर शेखनेही विजयी घोडदौड चालू केली.
(आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच )