रोमांचक क्रिकेट खेळा ईसीबीचा खेळाडूंना सल्ला
By admin | Published: March 22, 2017 12:09 AM2017-03-22T00:09:39+5:302017-03-22T00:09:39+5:30
इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) युवा खेळाडूंना क्रिकेटकडे आकर्षित करण्यासाठी राष्ट्रीय संघाचा नवा कसोटी कर्णधार ज्यो रुट
लंडन : इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) युवा खेळाडूंना क्रिकेटकडे आकर्षित करण्यासाठी राष्ट्रीय संघाचा नवा कसोटी कर्णधार ज्यो रुट व मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघाचे कर्णधारपद भूषविणाऱ्या इयान मॉर्गनला रोमांचक क्रिकेट खेळण्याचा व चमकदार कामगिरी करण्याचा सल्ला दिला आहे.
ईसीबीने स्थानिक क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या संख्येत वृद्धी करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. गेल्या पाच वर्षांत येथील तळागाळातील क्रिकेटच्या स्तरामध्ये विशेष प्रगती झालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर इंग्लंड क्रिकेट संघाची कामगिरी महत्त्वाची मानली जात आहे.
ईसीबीचे मुख्य कार्यकारी टॉम हॅरिसन म्हणाले, ‘‘इंग्लंडचे क्रिकेटपटू व सध्या क्रिकेट संचालक व माजी कर्णधार अॅण्ड्य्रू स्ट्रॉस यांना आपल्या जबाबदारीची चांगली कल्पना आहे.’’
हॅरिसन म्हणाले, ‘‘अॅण्ड्य्रू स्ट्रॉस आणि इंग्लंड संघाला साहसी क्रिकेट खेळण्याच्या आपल्या जबाबदारीची चांगली माहिती आहे. खेळाडू मैदानावर जातात त्या वेळी त्यांच्याकडून रोमांचक क्रिकेट खेळण्याची आशा असते. ज्यो रुट व इयान मॉर्गन युवा पिढीला या खेळाकडे आकर्षित करण्यासाठी रोमांचक क्रिकेट खेळण्याची जबाबदारी ओळखून आहेत. इंग्लंड संघाला पराभव स्वीकारावा लागला, पण संघाने आव्हानात्मक खेळ केला तर लोकांची प्रतिक्रिया सकारात्मक राहील. पूर्ण विचार करूनच ही रणनीती तयार करण्यात आली आहे. ही रणनीती प्रत्येक वेळी यशस्वी ठरेल, असे नाही, याची आम्हाला कल्पना आहे, पण आपण जर सर्वतोपरी प्रयत्न केला तर एखाद्या वाईट दिवसासाठी आपण माफीसाठी पात्र ठराल.’’(वृत्तसंस्था)