Exclusive : महाराष्ट्राच्या राहुल आवारेचं ऑलिम्पिक स्वप्न अधांतरी?; एक चूक पडू शकते भारी!

By स्वदेश घाणेकर | Published: January 14, 2020 12:03 PM2020-01-14T12:03:47+5:302020-01-14T12:16:21+5:30

राहुलची ती चूक म्हणावी की अतीआत्मविश्वास जो अंगलट आला?

Exclusive : Maharashtra wrestler Rahul Aware Olympic dream on jeopardy, one mistake can cost him? | Exclusive : महाराष्ट्राच्या राहुल आवारेचं ऑलिम्पिक स्वप्न अधांतरी?; एक चूक पडू शकते भारी!

Exclusive : महाराष्ट्राच्या राहुल आवारेचं ऑलिम्पिक स्वप्न अधांतरी?; एक चूक पडू शकते भारी!

googlenewsNext

चार वर्षांपूर्वी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी महाराष्ट्रचा मल्ल राहुल आवारेला डावलल्यानंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. 57 किलो वजनी गटातून प्रबळ दावेदार असताना राहुलला डावलून हरयाणा लॉबीनं संदीप तोमरची निवड केली. त्यानंतर त्या गटात भारताच्या पदरी काय लागले, हे सर्वज्ञात आहे. पण, या पाय खेचण्याच्या राजकारणाला शह देत राहुल नव्या दमानं उभा राहिला आणि 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीला लागला.

2016 ते 2020 या कालावधीत राहुलनं अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठीची आपली दावेदारी अधिक भक्कम केली. त्यामुळे आता त्याला डावलण्याचे धाडस कुणीच केले नसते. पण, नशीबाचा खेळ म्हणा एका निर्णयामुळे आता त्याचा ऑलिम्पिक प्रवेश अडचणीत सापडला आहे. राहुलचे ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न अधांतरी राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 


टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याचं स्वप्न उराशी बाळगून गेली अनेक वर्ष अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या राहुलला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. जागतिक स्पर्धेत 61 किलो वजनी गटात खेळण्याचा अतिआत्मविश्वास राहुलला नडला. 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेत राहुलनं 57 किलो वजनी गटातून सुवर्णपदकाची कमाई केली. 57 किलो हा ऑलिम्पिक वजनी गट असल्यानं 2020च्या स्पर्धेसाठी या गटातून राहुलची निवड पक्कीच होती. पण, एका निर्णयानं त्याचा घात केल्याचं चित्र सध्या उभे राहिले आहे. 


गतवर्षी कझाकिस्तान येथे 14 ते 22 सप्टेंबर या कालावधीत जागतिक स्पर्धा खेळवण्यात आली. या स्पर्धेत पदकाची कमाई करून थेट ऑलिम्पिक पात्रता मिळवण्याची राहुलला संधी होती, परंतु त्यानं या स्पर्धेत 57 ऐवजी 61 किलो वजनी गटातून उतरण्याचा निर्णय घेतला. त्यामागे त्याचा उद्देश हा केवळ भारताला पदक जिंकून देण्याचा होता आणि त्यानं तो साध्यही केला. पण, याच स्पर्धेत 57 किलो वजनी गटातील आव्हान लक्षात घेता भारताचा मल्ल रवी कुमार दहीया पदक पटकावणार नाही याची खात्री राहुलला होती. पण, नशीबानं थट्टा केली. रवी कुमारनं कांस्यपदकाची कमाई करून 57 किलो वजनी गटातून ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केले. 


जागतिक स्पर्धेत 61 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकल्यानंतरही राहुलनं 'लोकमत'कडे बोलताना ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न अजूनही जीवंत असल्याचे सांगितले होते. पण, भारतीय कुस्ती महासंघानं नुकत्याच जाहीर केलेल्या Senior Asian Championship and Asian Olympic Qualifier स्पर्धेसाठी निवडलेल्या ऑलिम्पिक पात्रता गटासाठीच्या संघात 57 किलो गटात रवी कुमारलाच संधी दिली. सूत्रांनी 'लोकमत'ला सांगितले की,''रवीनं 57 किलो वजनी गटातून ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे तोच या गटातून ऑलिम्पिक स्पर्धेत खेळेल, राहुल आवारे नाही.''


याबाबत राहुलशी संपर्क केला असता तो म्हणाला,''जागतिक स्पर्धेच्या वेळी मी मांडलेलं गणित चुकलं. 57 किलोच्या निवड चाचणीत मी अनेकदा रवी कुमारला पराभूत केले आहे. त्यामुळे जागतिक स्पर्धेत तो पदकापर्यंत मजल मारेल, असे वाटले नव्हते. पण, रवी कुमारचं नशीब बलवत्तर होतं आणि त्यानं पदकासह ऑलिम्पिक पात्रताही निश्चित केली. माझं ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याचं स्वप्न अजूनही भंगलेलं नाही. सध्या तरी वाट पाहणं माझ्या हातात आहे.''

पण, ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न कसं आणि कोणत्या गटातून पूर्ण करणार याबाबत राहुलनं काहीच स्पष्ट सांगितले नाही. 
 

Web Title: Exclusive : Maharashtra wrestler Rahul Aware Olympic dream on jeopardy, one mistake can cost him?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.