ललिता, टिंकू, सुधाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा
By admin | Published: July 14, 2016 02:56 AM2016-07-14T02:56:54+5:302016-07-14T02:56:54+5:30
रियो आॅलिम्पिकमध्ये भारतीय अॅथलेटिक्समध्ये कोणता खेळाडू पदक जिंकेल, याचा अंदाज आत्ताच बांधणे चुकेची होईल.
बंगळुरू : रियो आॅलिम्पिकमध्ये भारतीय अॅथलेटिक्समध्ये कोणता खेळाडू पदक जिंकेल, याचा अंदाज आत्ताच बांधणे चुकेची होईल. परंतु, ललिता बाबर, टिंकू लुका आणि सुधा सिंह या धावपटू त्यांच्या-त्यांच्या क्रीडा प्रकारांत अंतिम फेरीपर्यंत मजल मारतील अशी आशा वाटते, असे भारताची माजी आॅलिम्पियन पी. टी. उषाने वृत्तसंस्थेस सांगितले.
ग्रांप्री अॅथलेटिक्स स्पर्धेच्या निमित्ताने उषा बंगळुरू येथे आली असता, तिने वरील व्यक्तव्य केले. भारतीय आॅलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्या देशातील अॅथलेटिक्स खेळाडूंनी आपली पात्रता सिद्ध केली आहे. त्यामुळे कोणता खेळाडू कशी कामगिरी करील, हे आत्ताच सांगणे कठीण आहे. सर्व खेळाडू चांगल्या कामगिरीसाठी प्रयत्नशील असणार आहेत. प्रत्येकाचे प्रथम लक्ष्य अंतिम फेरीपर्यंत पोहोचणे, हे असणार आहे. पदकांचा अंदाज एवढ्यातच वर्तविणे योग्य नाही. कारण कोणत्या खेळाडूचा खेळ त्या वेळेच कसा होईल, हे त्या दिवशीच कळेल. लांब पल्ल्याच्या धावपटू ललिता बाबर (३ हजार मीटर स्टिपलचेस), सुधा सिंह (३ हजार मीटर स्टिपलचेस) आणि मध्यम पल्ल्याची धावपटू टिंकू लुका (८०० मीटर धावणे) या अंतिम फेरीसाठी पात्र होऊ शकतात. कारण त्यांच्या गटात धावणारे इतर देशांच्या धावपटूंनी त्याच्या पात्रता शर्यतीत दिलेली वेळ आणि आपल्या भारतीय धावपटूंची सध्याची वेळ यात खूप काही अंतर नाही. काही सेकंदांचा फरक आहे.
या तिन्ही खेळाडूंनी गेल्या काही वर्षांत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांनी पदकेसुद्धा जिंकली आहेत. त्यामुळे त्यांना आॅलिम्पिकमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव कमी पडेल, असे होणार नाही. त्या चांगली कामगिरी करू शकतात. पुरुष व महिलांचा रिले संघसुद्धा चांगली कामगिरी करू शकतो. त्याच्या एकमेकांमध्ये चांगला समन्वय निर्माण झाला आहे. त्याचा त्यांना खूप फायदा होणार आहे. रंजी महेश्वरीसुद्धा
अंतिम फेरीत पोहोचू शकतो. त्याचबरोबर द्युतीचंदकडून अपेक्षा करता येईल १०० मीटरमध्ये
११.२१ सेकंदांची वेळ नोंदविली, तर ती उपांत्य फेरीसाठी पात्र होऊ शकते. तिने आता ११.२६ सेकंदांची वेळ नोंदविली आहे. (वृत्तसंस्था)