पेसचा अपेक्षाभंग
By admin | Published: February 5, 2017 04:06 AM2017-02-05T04:06:15+5:302017-02-05T04:06:15+5:30
भारत-न्यूझीलंड डेव्हिस चषक टेनिस लढतीतील ऐतिहासिक सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित सुमारे साडेतीन हजार टेनिसप्रेमींच्या पदरी शनिवारी निराशा आली.
पुणे : भारत-न्यूझीलंड डेव्हिस चषक टेनिस लढतीतील ऐतिहासिक सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित सुमारे साडेतीन हजार टेनिसप्रेमींच्या पदरी शनिवारी निराशा आली. भारताचा दिग्गज खेळाडू लिएंडर पेस आणि विष्णूवर्धन ही जोडी अतिशय अटीतटीच्या लढतीत पराभूत झाल्याने डेव्हिस चषकाच्या इतिहासात सर्वाधिक दुहेरी लढती जिंकण्याचा पेसचा विश्वविक्रम हुकला. तब्बल अडीच तासांपेक्षा जास्त वेळ ताणली गेलेली ही लढत ३-६, ६-३, ७-६ (८-६), ६-३ ने जिंकून आर्टम सिटाक आणि मायकेल व्हिनस जोडीने पेससह भारतीय टेनिसप्रेमींचा अपेक्षाभंग केला.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस स्टेडियमवर उभय संघांमधील आशिया-ओशनिया गटातील ही लढत सुरू आहे. डेव्हिस चषकात दुहेरीतील ४२ विजयांचा धनी असलेल्या पेसला विश्वविक्रमासाठी आजचा सामना जिंकणे आवश्यक होते. कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर असलेला ४३ वर्षीय पेस ही लढत जिंकून विश्वविक्रम रचण्यासाठी उत्सुक होता. दुसरीकडे, पहिल्या दिवशीच्या दोन्ही लढती गमावल्यामुळे ०-२ने माघारलेल्या पाहुण्या न्यूझीलंड संघाला आपले आव्हान जीवंत ठेवण्यासाठी दुहेरीचा सामना जिंकणे आवश्यक होते. या संघर्षात अखेर अस्तित्वासाठी झुंज देणाऱ्या न्यूझीलंडच्या संघाने सरशी साधली. या लढतीत यजमान भारत सध्या २-१ने आघाडीवर असून रविवारी (दि. ५) परतीच्या एकेरीच्या लढती होतील. ही लढत जिंकण्यासाठी रविवारच्या दोनपैकी एका लढतीत भारताला विजय आवश्यक आहे.
पहिला सेट अवघ्या २८ मिनिटांत ६-३ असा जिंकत भारतीय जोडीने आश्वासक प्रारंभ केला. जवळपास २ मिनिटांत भारतीय जोडीने पहिला गेम झटपट जिंकल्यानंतर न्यूझीलंडच्या जोडीनेही आपली सर्व्हिस राखत १-१ अशी बरोबरी साधली. २-२ अशा स्कोअरनंतर भारतीय जोडीने खेळावर पकड घेत ५-२ने आघाडी साधली. नेटजवळील कमजोर खेळ हा पाहुण्या जोडीचा कच्चा दुवा हेरून पेस-विष्णू यांनी पहिल्या सेटमध्ये त्याचा फायदा उचलला. त्यांनी पाहुण्यांना नेटजवळ चुका करण्यास बाध्य केले. दुसरीकडे पेसचा नेटजवळील चपळ अन् वेगवान खेळ बघता हा तो ४३ वर्षांचा आहे, यावर विश्वास बसत नव्हता. विष्णूनेही त्याला तोलामोलाची साथ दिली. आठवा गेम न्यूझीलंड जोडीने झटपट जिंकत आपण सहजासहजी नमते घेणार नसल्याचे संकेत दिले. नवव्या गेममध्ये पेसने नेटजवळ बॅकहॅन्डचा अप्रतिम शॉट लगावत ३०-० अशी आघाडी घेतली. पाठोपाठ व्हीनसचा रिटर्न शॉट नेटमध्ये अडकला. नंतर मात्र पाहुण्यांनी स्कोअर ४०-३० असा खेचला. अखेर विष्णूने वेगवान एस सर्व्हिस करीत पहिला सेट ६-३ने भारताच्या नावे केला.
दुसऱ्या सेटच्या प्रारंभी दोन्ही जोडींनी आपापली सर्व्हिस राखली. चौथ्या गेममध्ये सिटाक-व्हिनस जोडीने भारतीयांची सर्व्हिस ब्रेक करून ३-१ने आघाडी घेतली. पेस-विष्णू यांचा खेळ मंदावल्याचा लाभ उचलत न्यूझीलंडच्या जोडीने कमबॅक केले. नवव्या गेममध्ये भारतीय जोडीची सर्व्हिस भेदत हा सेट ६-३ने जिंकत सामन्याची रंगत वाढवली. यावेळी पाहुण्यांचा धडाका बघता पेसच्या विश्वविक्रमाचे सेलिब्रेशन करण्यासाठी उपस्थित असलेल्या भारतीय पाठिराख्यांच्या मनात आपली पार्टी स्पॉईल होते की काय, अशी शंकेची पाल चुकचुकली. अखेर ती खरी ठरली. (क्रीडा प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती
पेसच्या लढतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते. प्रत्यक्षात मात्र ते आलेच नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीचे कारण कळू शकले नाही.
या वेळी मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, मनपाचे आयुक्त कुणाल कुमार, टेनिस महासंघाचे आजीव अध्यक्ष अनिल खन्ना, किशोर पाटील उपस्थित होते.
नाणेफेक नाना पाटेकरांच्या हस्ते...
पुरुषांच्या दुहेरी लढतीसाठी नाणेफेक सिनेअभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आला. नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला. या वेळी आयोजन समितीचे अध्यक्ष नितीन करीर उपस्थित होते.
आजच्या लढती...
रामकुमार रामनाथन
वि. फिन टिअर्नी
युकी भांबरी वि. जोस स्टॅथम