पाक-बांगलादेश रंगतदार लढतीची अपेक्षा
By admin | Published: March 2, 2016 02:54 AM2016-03-02T02:54:11+5:302016-03-02T02:54:11+5:30
सलग दोन लढतीत विजय मिळविल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या बांगलादेश संघाला आशिया कप राऊंड रॉबिन लढतीत बुधवारी पाकिस्तानच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
मीरपूर : सलग दोन लढतीत विजय मिळविल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या बांगलादेश संघाला आशिया कप राऊंड रॉबिन लढतीत बुधवारी पाकिस्तानच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानविना खेळावे लागणार आहे, तरी यजमान संघाविरुद्ध पाकिस्तानसाठी विजयाचा मार्ग सोपा नाही.
आयसीसी विश्व टी-२० स्पर्धेपूर्वी खेळल्या जाणाऱ्या उपखंडातील संघांदरम्यानच्या या स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी पाक व बांगलादेश या संघांना या लढतीत विजय आवश्यक आहे.
मशर्रफी मुर्तजा व त्याचा संघ या लढतीत विजय मिळवित आपल्या टीकाकारांना गप्प करण्यास प्रयत्नशील आहेत. त्याचसोबत या लढतीत विजय मिळवला, तर
विश्व टी-२० पूर्वी त्यांचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळणार आहे.
मुस्तफिजुरची दुखापत यजमान संघासाठी चिंतेचा विषय आहे. या वेगवान गोलंदाजामध्ये पाकिस्तानच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजण्याची क्षमता आहे. पाकिस्तानला यूएईविरुद्ध ७ गडी राखून विजय मिळविताना संघर्ष करावा
लागला होता. सीनिअर सलामीवीर तमिम इक्बाल संघात परतणे बांगलादेश संघासाठी चांगले
वृत्त आहे. तमिमकडून बांगलादेश संघाला आक्रमक सुरुवातीची अपेक्षा आहे.
दुसऱ्या बाजूचा विचार करता भारताविरुद्ध पहिल्या लढतीत पाकिस्तान संघाला लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आली नाही. पाकिस्तान संघाचा डाव केवळ ८३ धावांत संपुष्टात आला होता, तर यूएईविरुद्ध त्यांचे तीन
फलंदाज केवळ १७ धावांत माघारी परतले होते.
सलामीवीर शारजील खान व मोहम्मद हफीज यांना नैसर्गिक फलंदाजी करण्यासाठी कुठली अडचण येत आहे, हे अद्याप कळले नसल्याचे पाकिस्तानचे प्रशिक्षक वकार युनूस यांनी कबूल केले आहे. प्रशिक्षकांनी अनुभवी खेळाडू शोएब मलिकची प्रशंसा केली. मलिकने यूएईविरुद्ध सोमवारी नाबाद ६३ धावांची खेळी करीत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
मोहम्मद आमिरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानची गोलंदाजीची बाजू मजबूत आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांत आमिरची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. आमिरने वेगवान स्विंग माऱ्याच्या जोरावर भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवले, तर यूएईविरुद्ध त्याने चार षटकांत केवळ ६ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले.
आमिरला सीनिअर गोलंदाज मोहम्मद समीकडून चांगली साथ मिळेल, अशी अपेक्षा आहे. उंच चणीचा गोलंदाज मोहम्मद इरफानच्या चेंडूला उसळी मिळत आहे, पण त्याच्या गोलंदाजीमध्ये भेदकता नाही. पाक संघव्यवस्थापन फिरकीपटू मोहम्मद नवाजला संधी देणार की अनुभवी वेगवान गोलंदाज वहाब रियाज संघात परतणार, याबाबत उत्सुकता आहे.(वृत्तसंस्था)